मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान (Shah rukh khan) याच्या ‘जवान’ (Jawan movie) चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर (box office collection ) शानदार कमाई केली आहे. ॲटली याने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. किंग खानसोबत या चित्रपटात तीन नवे चेहरेही झळकले होते. त्या तिघी म्हणजे – आलिया कुरेशी, लहर खान आणि संजीता भट्टाचार्य. या तिघींनी प्रियामणि, सान्या मल्होत्रा आणि गिरिजा ओक यांच्यासोबत मिळून चित्रपटात शाहरूखच्या गर्लगँगमध्ये एकदम धमाल केली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने जवानच्या सेटवरचा एक किस्सा शेअर केला आहे. जिंदा बंदा या गाण्याच्या अनेक भागांत आलिया दिसली नव्हती. आलियाने त्यामागचं कारण नुकतंच स्पष्ट केलं. ती म्हणाली, या डान्सचे शूटिंग करताना माझ्यासोबत एक दुर्घटना झाली होती. आता ऐकायला हे मजेशीर वाटतं पण आम्ही जेव्हा रिहर्सल करत होतो, तेव्हा एका डान्सरच्या हातातील डफ होता तो हातातून सटकला आणि थेट माझ्या डोक्यावर पडला. तेव्हा ॲटली सर मला म्हणाले, की तुझ्या डोक्याला लागलंय, घरी जाऊन आराम कर.
आलियाने पुढे सांगितलं की पहिले दोन दिवस तर तिला धड चालताही येत नव्हतं.माझ्या डोक्यात खूप वेदना होत होत्या पण तिसऱ्या दिवशी मी पेनकिलर औषध घेतलं आणि जिंदा बंदा गाण्यात शाहरूख सोबत डान्स करायला ती परत सेटवर गेली. शाहरूख खान सोबत नाचण्याची संधी रोज-रोज थोडीच मिळते, ती कशी सोडणार ? असंही ती म्हणाली.
जवानची घोडदौड सुरूच
जवान चित्रपटाची बॉक्स ऑफीस घोडदौड सुरूच आहे. या चित्रपटात नयनतारा ही अभिनेत्री शाहरूखच्या अपोझिट दिसली होती. तर विजय सेतुपति हा अभिनेता निगेटीव्ह रोलमध्ये होता. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि संजय दत्त या दोघांचा देखील कॅमिओ आहे. ॲटली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून शाहरूखची पत्नी, गौरी खान ही या चित्रपटाची प्रोड्युसर आहे. हा शाहरुखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट आहे. शाहरुखचा आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त ॲक्शन अवतार या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. लोकांना देखील हा चित्रपट खूप आवडला असून तो सुपरहिट ठरला आहे.