मोठी बातमी समोर येत आहे, मल्याळम चित्रपट आणि टीव्ही अभिनेता दिलीप शंकर यांचा मृतदेह आज एका हॉटेलमध्ये आढळून आला आहे.ते तिरुअनंतपुरममधील वनरोज जंक्शन परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. दिलीप शंकर यांच्या मृत्यूमुळे मल्याळम सिनेसृष्टी तसेच टीव्ही इंडस्ट्री शोक सागरात बुडली आहे.अभिनेता दिलीप शंकर यांच्या मृत्यूमुळे त्यांचे सहकारी कुटुंब आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.
समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार दिलीप शंकर हे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमधील एका स्टाफने सर्वात आधी दिलीप शंकर यांचा मृतदेह पाहिला, त्यानंतर त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार ‘पंचाग्नी’ नावाच्या टीव्ही शोचं चित्रिकरण सुरू आहे.या शोच्या चित्रिकरणासाठी गेल्या चार दिवसांपासून दिलीप शंकर हे याच हॉटेलमध्ये मुक्कामी होते.
दिलीप शंकर हे एर्नाकुलममध्ये राहातात, या घटनेबाबत माहिती देताना हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, दिलीप शंकर हे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या रूमच्या बाहेर निघाले नव्हते.रविवारी जेव्हा त्यांच्या रूममधून वास येऊ लागला तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रूमध्ये प्रवेश केला.त्या ठिकाणी दिलीप शंकर हे मृत अवस्थेमध्ये आढळून आले. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचार्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.या घटनेबाबत माहिती देताना तिरुअनंतपुरम पोलिसांनी सांगितलं की मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण समोर येऊ शकेल.
दिलीप यांच्यासोबत काम करणारे दिग्दर्शक मनोज यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितलं की, चित्रिकरणासाठी दोन दिवसांचा ब्रेक देण्यात आला होता. मात्र यादरम्यान दिलीप यांनी त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याच्या फोन, मेसेजला प्रतिसाद दिला नाही.दिलीप यांना काही आरोग्याच्या समस्या देखील होत्या, त्यानंतर आज त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
कोण होते दिलीप शंकर
दिलीप शंकर हे मल्याळम फिल्म आणि टीव्ही जगतातले एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी काम केलेले सुंदरी, पंचाग्नि हे टीव्ही शो हीट ठरले आहेत.तसेच त्यांनी ‘चप्पा कुरीश’,‘नॉर्थ 24’ अशा काही चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.