Simran Singh Death : प्रसिद्ध रेडिओ जॉकी आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर सिमरन सिंगने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिमरन सिंगचा मृतदेह गुरग्राममधील एका खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सध्या याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. सिमरन सिंग ही प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर असून तिचे इन्स्टाग्रामवर 6 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या आत्महत्येची बातमी समजताच अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या अनेकजण तिच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसुार, सिमरन सिंग ही दिल्लीच्या गुरुग्राम परिसरात भाड्याने राहत होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास सिमरनचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या एका मैत्रिणीने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तिच्या रुमची तपासणी केली. पण कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच तिच्या कुटुंबियांनाही याबद्दलची माहिती देण्यात आली.
सिमरन ही दोन वर्षापासून या ठिकाणी राहत होती. बुधवारी तिच्या रुमचा दरवाजा खूप वेळ बंद होता. त्यामुळे खिडकीतून पाहिले असता तिने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतला होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
सिमरन सिंग ही जम्मूच्या डिग्याना परिसरात राहत होती. गेल्या दोन वर्षांपासून ती गुरुग्राममधील सेक्टर ४७ मध्ये भाड्याने राहत होती. ती फ्रिलान्सर म्हणून काम करत होती. तसेच ती सोशल मिडिया इन्फ्लुअन्सरही होती. ती विविध मजेशीर व्हिडीओ बनवून पोस्ट करायची. तिचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग होता. सिमरन सिंग ही इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रीय असायची. तिचे ७ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते. तिला जम्मूची धडकन म्हणून ओळखले जायचे. सिमनर ही रेडिओ मिरची या ठिकाणी आरजे म्हणून काम करत होती. ती २०२१ पर्यंत आर जे म्हणून काम करत होती. पण त्यानंतर तिने नोकरी सोडली.
सिमरन सिंगच्या आत्महत्येनंतर तिच्या इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा रंगली आहे. सिमरन सिंगने १३ डिसेंबरला एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत ती एक पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान करुन समुद्रकिनाऱ्यावर खळखळून हसताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिले होते. एक अशी मुलगी जी तिच्या हसण्याने आणि गाऊनने समुद्रकिनारा व्यापून टाकते, असे कॅप्शन सिमरनने दिले होते. तिच्या या कॅप्शनची आणि पोस्ट सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.