Salman Khan : दहावीपर्यंत शिक्षण, बुकीची हत्या… सलमानच्या घराखाली फायरिंग करणारा कालू कोण ?

| Updated on: Apr 15, 2024 | 9:20 AM

मुंबईतील वांद्रे येथे बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या विशाल राहुल उर्फ ​​कालूचे नाव समोर आले आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून विशालने हरियाणातील रोहतक येथे एका बुकीची हत्या केली होती. हा कालू नेमका कोण ?

Salman Khan : दहावीपर्यंत शिक्षण, बुकीची हत्या... सलमानच्या घराखाली फायरिंग करणारा कालू कोण ?
Follow us on

गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई गँग हे बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या मागे लागले आहेत. त्या दोघांकडूनही सलमानला इजा करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे ४.५० वाजता बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला. त्यांनी अनेक राऊंड फायर केल्या. या गोळीबारात कोणीही जखमी झालं नसल तरी या घटनेमुळे सलमानचे चाहते आणि कुटुंबीय चिंतेत आहेत. कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही अशी दुर्घटना घडणे भीतीदायक आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी 15 पोलिस पथके तयार करण्यात आली असून, ते प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ज्या बाईकवरून गोळीबार करणारे हल्लेखोर आले होते, ती बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या या बाईकची फॉरेन्सिक टीम कसून तपास करत आहे. या हल्ल्याप्रकरणी आता गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या भावानंतर आता कुख्यात गुन्हेगार रोहित गोदाराचेही नाव पुढे आले आहे.

हल्लेखोरांचा फोटो आला समोर

सलमान खानच्या घराबाहेर ज्यांनी गोळीबार केला त्या दोन हल्लेखोरांचा फोटोही आता समोर आला आहे. त्यांच्यापैकी एक हल्लेखोर हा काळ्या-पांढऱ्या टीशर्टमध्ये होता तर दुसऱ्याने लाल टीशर्ट घातला होता. त्याचसोबत 29 फेब्रूवारी 2024 चं एक सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं असून तो हरियाणाच्या रोहतकमधील एका ढाब्यावरील आहे. तिथे विशाल नावाची एक व्यक्ती दिसत आहे. सलमानच्या घराबाहेर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांपैकी एकाचा चेहरा हा त्या विशालशी मिळता जुळता असल्याचं सांगितलं जात आहे. विशाल उर्फ कालू याने सलमानच्या घराबाहेर फायरिंग केले असावे असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळ्या झाडताना दिसणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एक गुरुग्राममधील असल्याचा संशय आहे. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे पाचच्या सुमारास दोन शूटर्सनी चार राऊंड गोळीबार करून पळ काढला. वांद्रे पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत “अज्ञात व्यक्तींविरुद्ध” एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रविवारी सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर अनमोल बिश्नोई याने एका कथित ऑनलाइन पोस्टमध्ये या गोळीबाराची जबाबदारी घेतली. हा तर फक्त एक “ट्रेलर” होता, अशी धमकीही त्यातून सलमानला देण्यात आली.

कोण आहे विशाल राहुल उर्फ कालू ?

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात सहभागी असलेला विशाल राहुल उर्फ ​​कालू हा गुरुग्रामचा रहिवासी आहे. त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले असून त्याच्यावर 5पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये गोळीबार आणि दुचाकी चोरीसारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशालवर गुरुग्राम तसेच दिल्लीतही अनेक गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून विशालने हरियाणातील रोहतक येथे एका बुकीची हत्या केली होती. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या घटनेत तो गोळीबार करताना दिसत आहे. विशाल हा राजस्थानचा कुख्यात गँगस्टर रोहित गोदाराचा शूटर आहे. रोहित गोदरा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा संबंध हरियाणातील शूटर्सशी निगडीत असल्याने आता याप्रकरणी हरियाणा पोलीसही सक्रिय झाले आहेत.

सलमानला पूर्वीही मिळाल्या होत्या धमक्या

गेल्या वर्षी मार्च महिन्यात सलमान खान याला धमकीचा एक ई-मेल आला होता, त्यानंतर पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि आणखी एका व्यक्तीविरोधात आयपीसी कलम 120-बी (गुन्हेगारी कट), 506-II (गुन्हेगारी धमकी) आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. लॉरेन्स बिश्नोई यांने वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत सलमान खानने पाहिली असेल आणि नसेल तर त्यांनी ती पाहावी, असे ईमेलमध्ये म्हटले होते. जर सलमान खानला ही केस बंद करायची असेल तर त्याने ‘गोल्डी भाई’शी समोरासमोर बोलावे. अजून वेळ आहे पण पुढच्या वेळी झटका बसेल” अशी धमकी त्याद्वारे देण्यात आली होती. तर त्यापूर्वी जून 2022 मध्येही एका हस्तलिखित चिठ्ठीद्वारे सलमानला धमकी देण्यात आली होती.