Daniel Radcliffe Became Father: हॅरी पॉटर (Harry Potter) या जादुई चित्रपटांत प्रमुख भूमिका बजावणारा डॅनिअल रॅडक्लिफ (Daniel Radcliffe) हा खऱ्या नावाने कमी आणि हॅरी म्हणूनच जास्त ओळखला जातो. जे.के.रोलिंग यांच्या सुप्रसिद्ध पुस्तकांवर आधारित या चित्रपटांमध्ये डॅनिअलने हॅरीची प्रमुख भूमिका साकारली होती. तो जगभरात प्रसिद्ध झाला असून त्याचे लाखो चाहते आहेत. याच डॅनिअलच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला असून तो पिता बनला आहे. डॅनिअल व त्याची पार्टनर एरिन डार्क हे दोघे नुकतेच पालक बनले आहेत.
डॅनिअलच्या पब्लिसिस्टने अभिनेत्याच्या बाळाच्या जन्माची पुष्टी केली. काही महिन्यांपूर्वी डॅनिअल व त्याची पार्टनर एरिन यांचे काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये एरिन गरोदर असल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच दोघांनी आपल्या पहिल्या अपत्याचे स्वागत केले आहे. डॅनिअल रॅडक्लिफच्या फॅन पेजवरही ही माहिती शेअर करण्यात आली आहे, ज्यावर त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेक चाहते डॅनियलचे अभिनंदन करत आहेत. मात्र, या वृत्ताची अधिकृत घोषणा या जोडप्याकडून अद्याप करण्यात आलेली नाही. तसेच बाळाचा जन्म कधी झाला, तो मुलगा आहे की मुलगी, बाळाचे नाव काय, याबद्दल डॅनिअल व एरिन या दोघांनीही अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.
कोण आहे एरिन डार्क?
डॅनियल रॅडक्लिफची पार्टनर एरिन डार्क बद्दल बोलायचे तर, ती देखील चित्रपटसृष्टीतील एक सदस्य आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2013 मध्ये किल युअर डार्लिंग्स (Kill Your Darlings) चित्रपटाच्या सेटवर डॅनिअल व एरिन यांची भेट झाली. त्यांतर गेल्या दशकभरापासून दोघेही एकत्र आहेत. एरिनने अभिनेत्रीने 2011 मध्ये वी नीड टू टॉक अबाऊट केविन या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिने किल युअर डार्लिंग, द लॉन्गेस्ट वीक, लव्ह अँड मर्सी, द क्विटर, हंटर अँड गेम, डोंट थिंक ट्वाईस, नाईट कम्स ऑन सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.