मुंबई | 10 जानेवारी 2024 : बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता हृतिक रोशन त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अप्रतिम नृत्य ही देखील त्याची खासियत आहे. ‘कहो ना प्यार है’ या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या हृतिकने एकाहून एक हिट चित्रपटांत काम केलं आहे. तो बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे , ज्याला ग्रीक गॉडचा दर्जा देण्यात आला आहे. त्याचे गुड लूक्स आणि चार्म यामुळे तो सर्वांनाच प्रभावित करतो. सोशल मीडियावरही त्याचं तगडं फॅन फॉलोईंग आहे.
हृतिकने त्याचे वडील, अभिनेता – दिग्दर्शक यांच्या ‘कहो ना प्यार है’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्या चित्रपटांनंतर त्याला एक वेगळी ओळख मिळाली. आज, 10 जानेवारी ला हृतिक त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त त्याच्या आयुष्यातील एक असा किस्सा जाणून घेऊया, जो फार कमी लोकांना माहीत असेल.
जेव्हा रेखा यांनी हृतिकच्या कानशिलात लगावली
खरंतर 2003 साली प्रदर्शित झालेला’कोई मिल गया’ हा हृतिकचा चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरला. त्यामध्ये हृतिकशिवाय प्रिती झिंटा आणि रेखा यांची प्रमुख भूमिका होती. हृतिक आणि एका एलियनची मैत्री यावर आधारित चित्रपटाची कथी होती. त्याच चित्रपटादरम्यान रेखा यांनी हृतिकला कानाखाली लगाावली होती.
खरंतर या चित्रपटात एक सीन होता,त्यामध्ये हृतिक त्याच्या वडिलांचा कॉम्प्युटर वापरण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात हृतिकची आई, रेखा तिथे पोहोचतात आणि हृतिकला जोरदार कानाखाली मारतात. पण ती थप्पड खरंच एवढी जोरात बसली की हृतिक हादरलाच.
हैराण झाला हृतिक
हा सीन खरा वाटावा म्हणून मी तुला जोरात थप्पड मारेन, असं सीन शूट करण्यापूर्वी रेखा यांनी हृतिकला सांगितलं होतं. पण त्या मजा करत आहेत, असं हृतिकला वाटलं होतं, पण जसा तो सीन सुरू झाला रेखा वेगाने आल्या आणि त्यांनी हृतिकला एक जोरदार थप्पड मारली. एवढ्या जोरात कानाखाली बसेल याची हृतिकला कल्पनाच नव्हती आणि त्याचा गाल लालेलाल झाला. त्याच्या डोळ्यातून पाणीच आलं. खुद्द हृतिकनेच या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीत केला होता.
कामाबद्दल बोलायचं झालं तर हृतिक लवकरच ‘फायटर’ चित्रपटात दिसेल. त्यामध्ये दीपिका पडूकोण आणि अनिल कपूर यांचीही प्रमुख भूमिका आहे. २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहते आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत.