कर्नाटकमधील उरगल्ली येथे सुप्रसिद्ध ड्रामा मास्टर एस. केंपय्या यांना 6 एप्रिल 1953 रोजी मुलगा झाला. तो मुलगा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. वडील चित्रपटांसाठी काम करत असले तरी त्याला मात्र त्यात रस नव्हता. वडील लोकांना नाटक शिकवायचे. पण, त्याचे मन फक्त अभ्यासावर केंद्रित होते. जणू काही आयुष्यात पुढे काय बनायचे आहे हे त्याने त्या वयातच ठरविले होते. शाळेत शिकत असताना त्याने वडिलांना सांगितले, मला भविष्यात आयएएस व्हायचे आहे. त्याची ती इच्छा ऐकून घरातले आनंदी झाले. त्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी कुटुंबातील सदस्यांनी कोणतीही कसर सोडली नाही.
गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला बंगलोरला पाठवले. तिथे त्याने मन लावून अभ्यास केला. प्रत्येक परीक्षेत अव्वल मार्कांनी पास होत होता. इंग्रजी आणि कन्नड टायपिंग शिकला. काही काळातच त्याला सरकारी नोकरी मिळाली. पण, तो शांत बसला नाही. नोकरी करत असताना सकाळी काम करायचा आणि संध्याकाळी क्लासला जात असे. 1982 च्या सुमारास त्याने म्हैसूर मुक्त विद्यापीठातून इतिहास विषयात एमए केले. मग त्याने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरु केली. 1985 मध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि त्याच्या मेहनतीला फळ मिळाले. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक झाला.
1986 मध्ये त्याने अनुसूचित जाती प्रवर्गातून कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला. सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून त्याची निवड झाली. कर्नाटक पोलीस अकादमीत प्रशिक्षणादरम्यान यूपीएससीमध्ये त्याची निवड झाली आणि तो आयएएस झाला. लहानपणापासूनच त्याने जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाले. याशिवाय कन्नड भाषेत UPSC उत्तीर्ण करणारा तो पहिला व्यक्ती ठरला. त्या मुलाचे नाव होते शिवरामू केंपय्या…
आयएएस झाल्यानंतर शिवरामू यांनी विजापूर, बेंगळुरू, म्हैसूर, कोप्पल आणि दावणगेरे यासारख्या ठिकाणी काम केले. याकाळात त्यांनी मास एज्युकेशन कमिशनर, फूड कमिशनर आणि म्हैसूर सेल्स इंटरनॅशनल लिमिटेडचे एमडी अशी पदे भूषवली. लहानापासून वृद्धापकाळा नेहमी काही तरी नवीन शिका असा आग्रह ते धरत. आयएएस म्हणून त्यांची लोकप्रियता स्टारपेक्षा कमी नव्हती. व्यक्तिमत्त्वात कोणत्याही साऊथ स्टारपेक्षा कमी दिसत नव्हता. त्यामुळे त्यांना चित्रपटच्या ऑफर येऊ लागल्या. 1993 मध्ये पहिला चित्रपट ‘बा नले मधुचंद्रके’ प्रदर्शित झाला. यामध्ये हिरोच्या भूमिकेत ते दिसले होते. हा चित्रपट हिट ठरला.
चित्रपट हिट ठरला असला तरी त्यांच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला. कर्नाटक सरकारने 2004 साली एक आदेश जारी केला होता. यानुसार नोकरशहा किंवा सरकारी कर्मचारी चित्रपटात काम करू शकत नाहीत असा हा आदेश होता. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटात काम करण्याला आक्षेप घेण्यात आला होता. राज्य सरकारचा हा निर्णय आपल्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचे सांगत शिवरामू यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाने सरकारी सेवेत असताना चित्रपटांमध्ये काम करणे चुकीचे असल्याचे म्हटले. सरकारी अधिकारी कोणत्याही व्यवसायात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी होऊन पैसे कमवू शकत नाही, असा न्यायालयाने निर्णय दिला. याचा परिणाम असा झाला की, फिल्मी कारकीर्द करण्याची इच्छा असूनही ती त्यांना पूर्ण करता अली नाही. ज्या चित्रपटांचे काम हाती घेतले होते ते पूर्ण करून त्यांनी नंतर चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले. पुन्हा ते नोकरशाहीकडे वळले. मात्र, याच दरम्यान त्यांचे अन्य अधिकाऱ्यासोबत खटके उडू लागले. त्यामुळे त्यांनी नोकरशाहीला कंटाळून पूर्ण वेळ अभिनयाकडे लक्ष केंद्रित केले.
शिवरामू यांना कन्नड चित्रपटसृष्टीने स्वीकारले. ‘वसंत काव्य’, ‘सांगलियाना पार्ट-3’, ‘प्रतिभाने’, ‘खलनायक’, ‘यारीगे बेडा दुड्डू’, ‘गेम फॉर लव्ह’, ‘नागा’, ‘ओ प्रेमा देवते’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. 2013 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर ते जनता दलाचे सदस्य झाले. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून 14 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
शिवरामू याचा विवाह वाणी नावाच्या गृहिणीशी झाला. त्यांना इंचारा शिवराम नावाची मुलगी होती. तिचा विवाह कन्नड अभिनेता प्रदीप यांच्यासोबत झाला. शिवराम यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू होते. 29 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 70 व्या वर्षी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.