अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांची मोठी यंत्रणा तपासाच्या कार्याला लागली आहे. या प्रकरणातील एका संशयित आरोपीची ओळख पटल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. गँगस्टर विशाल उर्फ कालू हा प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी रोहतकच्या गुरूग्राममधील एका स्क्रॅप डीलरवर अंधाधुंद फायरिंग केल्याचा आरोपी तो आहे. गोळीबार केल्यापासून विशाल फरार होता. विशाल हा गुरूग्रामचा रहिवाशी गँगस्टर रोहित गोदरासाठी काम करत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानं मुंबईसह बॉलिवूडही हादरलंय. या घटनेवरुन विरोधक गृहखात्यावर निशाणा साधत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी याबाबत गंभीर दखल घेतलीय. सलमानची अतिरिक्त सुरक्षा दिली गेल्याचं म्हटलंय. मात्र सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे कोण होते? त्यांचा हेतू काय होता? यावरुन विविध चर्चा झडतायत. आम्ही सलमानला जीवे मारु शकतो, असा संदेश यातून द्यायचा होता? की मग आमच्या बंदुकीची गोळी सलमानच्या घरापर्यंत जावू शकते, हे हल्लेखोराला सांगायचं होतं? असे विविध तर्क लावले जात आहेत. सलमान खान मुंबईतल्या वांद्रेत राहतो. वांद्रेत गॅलेक्सी असं त्याच्या इमारतीचं नाव आहे.
सलमान खान गॅलेक्सी इमारतीच्या पहिला आणि दुसऱ्या मजल्यात राहतो. यापैकी पहिल्या माळ्यातल्या गॅलरीतून सलमान खान आपल्या चाहत्यांना अभिवादन करतो. त्याच गॅलरीवर गोळीबार झाला. एक गोळी ग्रीलच्या खालच्या बाजूला, दुसरी गोळी गॅलरीतल्या आतल्या भिंतीला, आणि तिसरी गोळी गॅलरीबाहेरच्या भिंतीला लागली. सलमान खान चाहत्यांना या गॅलरीतून अभिवादन करतो आणि नेमक्या त्याच गॅलरीच्या खाली एक आणि पाठिशी एक गोळ्या झाडण्यात आल्या.
गोळीबारानंतर मोटरसायकलवरुन आलेले दोन्ही फरार झाले. दोन्ही अज्ञातांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहितीनुसार, हल्लेखोरांनी एकूण ५ गोळ्या झाडल्या. त्यापैकी ४ सलमान खानच्या घरावर तर एक गोळी झाडली न गेल्यानं इमारतीच्या परिसरात जीवंत काडतूस सापडलं. गोळीबार झालेली ठिकाणं स्पॉट केल्यानंतर सलमान खानवर आम्ही हल्ला करु शकतो, हाच हल्लेखोरांना इशारा
द्यायचा होता. हे स्पष्ट दिसतंय. कारण गोळीबारावेळी सलमान खानसह त्यांचं कुटुंब घरातच होतं.
सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर आहे. अनेकदा सलमानला धमक्याही मिळाल्या आहेत. बिश्नोई समाजात प्राण्यांना आणि खासकरुन हरणांना पूज्य मानलं जातं, म्हणून काळवीट शिकार प्रकरणापासून सलमान खानला बिश्नोई गँग इशारा देत आलंय. गोळीबारानंतर एक फेसबुक पोस्ट चर्चेत आलीय. अनमोल बिश्नोई या अकाऊंटद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली गेलीय. पोलीस अकाऊंटची सत्यता पडताळत आहेत. दरम्यान, सांगण्यासारखे काहीच नाही. कारण, असले प्रकार करून त्यांना फक्त प्रसिद्धीच्या झोतात यायचं आहे, काळजी करण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया सलमान खानचे वडील सलीम खान यांनी दिलीय.
काही महिन्यांपूर्वीच बिश्नोई टोळीनं सिद्धु मुसेवालाची हत्या केली. त्यानंतरही सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली गेली होती. याआधी सरकारी सुरक्षेत सलमान खानसोबत 1 पोलीस कॉन्स्टेबल असायचा. जर सलमान वैयक्तिक भेटीगाठीसाठी बाहेर पडला तर त्याच्यासोबत त्याचे 4 खासगी सुरक्षारक्षक असतात. आणि शुटिंग किंवा सार्वजनिक कार्यक्रमावेळी एकूण १० खासगी अंगरक्षकाचं सलमानभोवती सुरक्षाकडं असतं. त्यात नंतर सलमान खानला अजून 3 पोलीस कॉन्स्टेबल देण्यात आले होते. त्याही आधी काळवीट प्रकरणात सलमान तुरुंगात होता, तेव्हाही लॉरेन्स बिश्नोईनं सलमान मारण्याची खुलेआम धमकी दिली होती. कारण, सलमान कैदेत असलेल्या तुरुंगातच बिश्नोई टोळीचे 20 गँगस्टर बंद होते. पण पोलिसांच्या बंदोबस्तामुळे बिश्नोईचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत.
2018 साली लॉरेन्स बिश्नोईनं संपत नेहरा नावाच्या त्याच्या शार्पशूटरला सलमानच्या हत्येची सुपारी दिली. हत्येसाठी संपत नेहरा मुंबईत पोहोचला. सलमान खान वांद्रेतल्या ज्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो, त्या घराची त्यानं रेकी केली. अनेक दिवस घराबाहेर थांबून त्यानं फोटो काढले. सलमान किती वाजता घराबाहेर पडतो, शुटिंगसाठी निघताना तो कोणत्या मार्गानं फिल्मसिटीत जातो, इथंपासून सर्व तयारी बिश्नोईच्या शार्प शूटरनं केली. सर्व माहिती गोळा झाल्यानंतर हल्लाची तारीख ठरवण्यासाठी संपत नेहरा पुन्हा हरियाणाला परतला. पण तेव्हाच हरियाणा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.