मुंबई : प्रेम…प्यार…लव्ह…इष्क…भाषा कोणतीही असो या भावनेत खूप ताकद आहे. प्रेमाला शब्दांत सांगणं तसं कठीणच आहे. प्रेम हे फक्त जोडीदारावरच असतं असं नाही तर कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रांवरही असू शकतं. ते कुठेही, कधीही जडू शकतं. प्रेमाची महत्त्वाची गोष्टी म्हणजे प्रेम हे बांधून ठेवणारं नसून ते मुक्त करणारं असतं. खरं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. तरीही अनेक जण आपल्या प्रेमभावना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानं खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. याच खास दिनाचं औचित्य साधून ‘मिनी फिल्म्स’नं घोषणा केली आहे ‘लव्ह यू मित्रा’या चित्रपटाची.
तरुणाईला भावणारा चित्रपट
हा चित्रपट आजच्या तरुणाईला भावणारा, मनोरंजक आणि नवीन विचार मांडणारा असा असणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शक मानसी बागला असून वरुण बागला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिद्धार्थ साळवी यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. ‘लव्ह यू मित्रा’मध्ये पूजा सावंत, गश्मीर महाजनी ही बेस्टफ्रेन्ड्स असलेली जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार असून आणखी एका कलाकारचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता हा तिसरा कलाकार कोण असणार, हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दिग्दर्शकांची प्रतिक्रिया
‘अशा प्रकारचा विषय मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच हाताळण्यात आला आहे, हा सिनेमा आपण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत नक्कीच पाहू शकता’, अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या दिग्दर्शक मानसी बागला यांनी दिली.
दिग्दर्शकीय पदार्पणासाठी पूजानेही मानसी बागला यांना शुभेच्छा दिल्या असून या चित्रपटाची ती आतुरतेने वाट बघत असल्याचेही तिने सांगितले. तर गश्मीर म्हणतो,” ही स्क्रिप्ट वाचतानाच माझ्या मनाला खूप भावली. त्यात एक वेगळेपण आहे. चित्रपटाचा आशय अतिशय प्रगल्भ आहे . मिनी फिल्म आणि संपूर्ण टीमला माझ्या खूप शुभेच्छा!”
चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार
चित्रपटाचं नाव आणि पोस्टरवरून त्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे हे नक्की. पूजा आणि गश्मिर च्या चाहत्यांसाठी ही एक अप्रतिम भेटच ठरणार आहे. ‘लव्ह यू मित्रा’ची मूळ संकल्पना जरी प्रेमकथेवर आधारित असली तरी हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असा आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.