पिंपरी-चिंचवड | 9 मार्च 2024 : बॉलिवूडमध्ये सौंदर्यवती अनेक आहेत, पण एव्हरग्रीन असं सौंदर्य असलेली, अभिनयाप्रमाणेच नृत्यातही तितकीच निपुण असलेली बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षित हिची बातच काही और आहे. तिच्या सौंदर्याची, मधुर हास्याची आजही अनेकांना भुरळ पडते. लाखो लोकांच्या हृदयावर ती राज्य करते. मात्र गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षितच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. ती भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चाही अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण त्यावर ना माधुरी, ना भाजप, कोणाकडूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यांनी याबाबत काही भाष्यही केले नाही.
पण आता खुद्द माधुरी दीक्षित हिनेच याबाबतचे मौन सोडत मोठं विधान केलं आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या माधुरीने पत्रकारांशी संवाद साधलाच आणि राजकारणाबद्दलही भाष्य केलं.
काय म्हणाली माधुरी दीक्षित ?
कला क्षेत्र गाजवल्यानंतर आता राजकारणात येण्याची इच्छा आहे का, असे तिला विचारण्यात आले. तुम्हाला राजकारण आवडतं का ? असा प्रश्न मला अनेक वेळा विचारला जातो. पण खरं सांगायचं तर मी एक कलाकार आहे. माझी जी कला आहे, त्याच्यात माझा चांगला जम बसला आहे. त्यात मला रस आहे. राजकारण मला माहित नाही. राजकारण माझी वृत्ती नाही किंवा ते माझं क्षेत्र नाही, असं माधुरी दीक्षितने स्पष्ट केलं.
भाजपकडून ऑफर आहे का ?
तेव्हाच एका पत्रकाराने सगळ्यांच्याच मनातील प्रश्न माधुरीला विचारला. भाजपकडून तु्म्हाला ऑफर (मिळाली) आहे का ? असा सवाल त्याने विचारला. त्यावर माधुरीने हसत हसत उत्तर दिलं, ते मी तुम्हाला का सांगू ? असा उलट सवाल विचारत माधुरीने तो सवाल अलगद टाळला. आणि राजकारण प्रवेशाबाबतचा हा सस्पेन्स (पुन्हा) कायम ठेवला.
भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. महाराष्ट्रातील उमेदवार अंतिम करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. भाजप अभिनेते, अभिनेत्री यांना लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील एका जागेवर माधुरी दीक्षितला निवडणुकीत उतरविण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.