‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा घराघरात पोहोचलेला, लोकप्रिय कार्यक्रम. मनोरंजनाची, तूफान हसवण्याची गॅरंटी देणारा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. हास्यजत्रेमुळे गौरव मोरे, वनिता खरात, समीर चौघुले, ओंका राऊत, दत्तू मोरे यांसारखे कलाकार चांगलेच लोकप्रिय झाले असून त्यांची लोकप्रियता घराघरांत पोहोचली आहे. त्या कलाकारांपकी एक असलेल्या दत्तू मोरे याने नुकताच त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्त त्याच्या पत्नीने त्याला खास गिफ्ट म्हणून बाईकही दिली.
त्याचा व्हिडीओ दत्तूने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. त्यावर शेकडो लोकांच्या लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव झाला. चाहत्यांच्या प्रेमाने भारवलेल्या दत्तूने त्यांचे आभार तर मानले. पण त्यातही एका चाहत्याने खोचक कमेंट केल्यावर, दत्तूचा हजरजबाबीपणा दिसून आला आणि त्याच्या प्रतिक्रियेचे सर्वांनीच कौतुक केले.
दत्तूला गिफ्ट मिळाली बाईक
दत्तू मोरो याने गेल्या वर्षी ( 2023 ) मध्ये गुपचूप लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. त्यानंतर ठेवण्यात आलेल्या रिसेप्शनला महाराष्ट्राची हास्यजत्रामधील त्याचे अनेक सहकलाकार उपस्थित होते आणि त्यांनी नवजोडप्याला शुभेच्छा दिल्या. दत्तू आणि स्वाती यांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस नुकताच (23 मे) साजरा केला. त्यावेळी त्याच्या पत्नीने एक नवी बाईक त्याला गिफ्ट दिली. त्याचा व्हिडीओ देखील दत्तू याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत नव्या बाईकसाठी पत्नीचे आभार मानले होते.
बाईकवर पाय पुरतात का हो ?
त्यावर चाहत्यांच्या लाईक्सचा, कमेंट्सचा पाऊस पडला.अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या, नव्या बाईकबद्दल अभिनंदन केलं. मात्र त्यातील एका कमेंटने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. एका चाहत्याने दत्तूला शुभेच्छा तर दिल्या पण त्यासह एक खोचक कमेंटही केली. ‘ भाऊ राग नका येऊ देउ पण तुमचे पाय पुरतात का त्या गाडीहून……’ असा सवाल त्याने दत्तू याला विचारला. त्याच्या या खोचक कमेंटला दत्तू यानेही अगदी मजेशीर उत्तर दिलं. ‘हो, म्हणूनच घेतली ‘ असे लिहीत दत्तू याने हसण्याच्या अनेक ईमोजीही त्या पोस्टवर टाकल्या. दत्तू याने ही कमेंट स्पोर्टिव्हली घेतली मात्र इतरांना मात्र त्या इसमाची ही कमेंट काही आवडली नाही, काहींनी तर त्याला थेट सुनावलंही. ‘ भाऊ, कधी तरी मराठी माणसाला सपोर्ट करा की’ असं लिहीत दुसऱ्या चाहत्याने त्याला खडसावलं.