प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहता यांचा काल मृत्यू झाला. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून त्यांनी उडी मारून जीव दिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पोलिसांनी सुरुवातीपासूनच ही आत्महत्या नसल्याचं सांगितलं होतं. अनिल हे आजारीही नव्हते. त्यामुळे अनिल मेहता यांचा मृत्यू कसा झाला? याबाबतच्या उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. पोस्टमार्टम रिपोर्टमधूनच या सर्व गोष्टी समोर येणार होत्या. त्यामुळे सर्वांचं लक्ष पोस्टमार्टम रिपोर्टकडे लागलं होतं. अनिल मेहता यांचा पोस्टमार्टम अहवाल आला असून त्यातून धक्कादायक माहितीसमोर आली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगळ्या अँगलकडे गेल्याचं सांगितलं जात आहे.
अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या मृतदेहाचे कूपर पोस्टमॉर्टम सेंटरमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. या प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण अनेक जखमा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनिल यांना एवढ्या जखमा कशामुळे झाल्या? जखमा आधीच होत्या की इमारतीवरून पडल्यामुळे या जखमा झाल्या? याबाबतचे गुढ निर्माण झाले आहे.
व्हिसेरातून गूढ उकलणार?
अनिल यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी आणि मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी त्यांचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. काल रात्री 8च्या सुमारास अनिल यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
रक्त सापडले
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल इमारतीतून ज्या ठिकाणी कोसळले तिथे रक्त मिळालं आहे. अनिल मेहता हे बाल्कनीत बसून पेपर वाचायचे. लिव्हिंग रुममध्ये त्यांची चप्पल होती. जेव्हा आम्ही बाल्कनीतून पाहिलं तेव्हा वॉचमन मदतीसाठी जोरजोरात ओरडत होता, असं मलायकाच्या आईने पोलिसांना सांगितलं.
मुलीशी संवाद
दरम्यान, मृत्यूपूर्वी अनिल यांनी त्यांची मुलगी मलायका अरोरा हिच्याशी फोनवर संवाद साधला होता. एक दिवस आधीच या दोघांचं फोनवर बोलणं झालं होतं. तसेच ते एक दिवस आधी दुसरी मुलगी अमृता अरोरालाही भेटले होते. मी आजारपणाला कंटाळलोय, असं त्यांनी या दोन्ही मुलींना सांगितल्याचं सांगण्यात येतं. आजारपणामुळेच त्यांनी आत्महत्या केली का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.