“एक पार्टी 1500 देतेय दुसरी 3000…”, ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “पैसे कुठून…”

| Updated on: Nov 17, 2024 | 12:24 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या योजनेवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने यावरुन टीका केली आहे.

एक पार्टी 1500 देतेय दुसरी 3000..., ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची ती पोस्ट चर्चेत, म्हणाले पैसे कुठून...
गिरीश ओक
Follow us on

Girish Oak Facebook Post : राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रात निवडणुकांच्या प्रचारासाठी अवघे २४ तास शिल्लक आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सातत्याने चर्चा पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात आले आहेत. असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. या योजनेवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने यावरुन टीका केली आहे.

ज्येष्ठ मराठी अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी नुकतंच फेसबुकला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वत:ला पडलेले दोन ‘भाबडे’ प्रश्न पोस्टच्या माध्यमातून विचारले आहेत. यासोबतच त्यांनी विधानभवनाबाहेरील एक फोटोही शेअर केला आहे. सध्या गिरीश ओक यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

गिरीश ओक यांची पोस्ट

“मला पडलेले दोन भाबडे प्रश्न”
पहिला : एक पार्टी १५०० देतेय दुसरी ३००० देणार म्हणतेय इतरही बरीच पैश्याची आश्वासनं दिली जातायत्, पण हे देतायत्/देणार कुठून आपल्या टोल,आयकर,जीएसटी मधूनच नं ?
मग आपल्याला विश्वासात घेऊन विचारणं सोडाच पण सांगणं तरी.
दुसरा : आणि हे जे एटीएम च्या किंवा इतर गाड्यांमधे पैसे पकडले जातायत् ते असे ॲाड संख्येत म्हणजे १ कोटी २७ लाख किंवा २ कोटी ७० लाख असे कसे आहेत. देणाराही असे का देतोय आणि घेणारालाही असे कसे हवे आहेत. की हे वरचे पैसे म्हणजे पोचवणाऱ्यांचा पोचवण्याचा मेहनाताना आहेत की पोचवताना ते पोचवणारेच लंपास करतायत् किंवा पकडणारे थोडे लंपास करून उरलेलेच सापडले असं सांगतायत्. कोणी सांगेल का मला? असे गिरीश ओक यांनी म्हटले आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट

गिरीश ओक यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ओक साहेब… तुमचे प्रश्न… माझे सुध्दा आहेतच..जनतेच वाली कोणी नाही.. आता राजकारण म्हणजे धंदा आहे… तेथे कॅरेक्टर लागत नाही वय कोण विचारत नाही.. शिक्षण नसलं तरी चालतं, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर एकाने आमच्या ही मनात असे बरेच प्रश्न येतात पण ते लोकांपर्यत पोचत नाहीत . आपल्या सारख्या लोकांनी कुणाची बाजू न घेता वास्तव बोलणे गरजेचे आहे जेणेकरून खूप लोकांपर्यत पोचेल . धन्यवाद . नर्मदे हर, असे म्हटले आहे.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात आले. असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ७००० रुपये जमा झाले. तर काही महिला अद्याप पैसे मिळतील या प्रतिक्षेत आहेत.