बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींना ‘कास्टिंग काऊच’चा अनुभव येतो. कलाविश्वात काम देतो या नावाखाली अनेक अभिनेत्रींना कॉम्प्रमाईज करण्याबाबत विचारलं जातं. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री माधुरी पवार हिला देखील आला. ‘अल्याड पल्याड’ या सिनेमाच्या निमित्त एका मुलाखतीदरम्यान माधुरीने तिला आलेला अनुभव सांगितला. एकदा माधुरीला देखील असा फोन आला होता. त्या व्यक्तीला ‘साताऱ्याच्या शिव्या’चा अनुभव दिला, असं माधुरीने सांगितलं.
मला एकदा एक फोन आला. मला वाटलं असेल कुणाचा फोन… तर मग मी तो फोन घेतला. तेव्हा लक्षात आलं की हा काही तरी वेगळा फोन आहे. त्याने मला विचारलं की मॅडम तुमची डेट मिळेल का? मला तुम्हाला भेटायचं आहे. मग मी त्याला म्हटलं की, या मग आमच्या घरी… तर त्याचं म्हणणं होतं की एकट्यात भेटायचं आहे. पण मी म्हटलं की एकटीलाच का भेटायचंय तुला… तर म्हणे भेटतात की, मराठी हिरोईन भेटतातच की… ही भेटते ती भेटते… त्याने नावं घ्यायला सुरुवात केली, असं माधुरीने सांगितलं.
मग मला लक्षात आलं की हा काय प्रकार आहे. तर मग मी म्हटलं ठीक आहे भेटते मी तुला… पण तू आता कुठे आहेस? तर तो म्हणे इथे-इथे आहे. तर त्याला म्हटलं की तू तिथंच थांब. तुझी कशी फाडायची ते मी तिथं येऊन तुला मी सांगते… मग माझी डेट कशी असते ते तुला कळेल. मी गेले आणि त्याला बरोबर सांगितलं की डेट काय असतं ते…, असं माधुरी पवार हिने या मुलाखतीत सांगितलं.
सोलापूर भागातील मुलगा आहे. त्याचं मी नाव नाही घेणार. पण आता परवाच्या दिवशी एका चांगल्या माणसाने मला फोन केला होता. तेव्हा म्हणे हा – हा व्यक्ती माझ्यासोबत आहे. मग तो मला म्हणे, मॅडम नमस्कार ओळखलंत का? तर मी म्हटलं चांगलीच ओळख आहे. फाडणाऱ्याची चांगलीच ओळख ठेवते मी…. तू चांगलाच लक्षात आहे. तर मग त्याने हो -हो केलं. तुमचं चांगलं चाललंय, असं म्हणाला. मी म्हटलं फोन त्या दुसऱ्या व्यक्तीकडे दे आणि त्याने दिला. त्यामुळे मला काही गोष्टी नाही खपत तर नाही खपत…, असं म्हणत माधुरी पवारने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला.