अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे करत असते. आताही प्राजक्ता एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फुलवंती’ हा तिचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फुलवंती’ या सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची…. रंभा जणू मी देखणी’ असे या गाण्याचे बोल आहेत. ‘फुलवंती’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रेक्षकांना भावतं आहे. या गाण्याचा व्हीडिओ प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केलाय. याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पेशवाईत लोककला आणि लोककलावंतांना मोठा राजश्रय मिळत असे. याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर झाली. ‘फुलवंती’ चे अस्मानी सौन्दर्य आणि आणि मनमोहक नृत्यकला यांचं दर्शन आपल्याला ‘फुलवंती’ या शीर्षकगीतातून होणार आहे. आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. हा सिनेमा येत्या 11 ऑक्टोबरपासून प्रदर्शित होणार आहे.
‘फुलवंती’ हे गाणं गीतकार वैभव जोशी, विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या लेखणीतून साकारलेले आहे. गायिका आर्या आंबेकर हिने गायलं आहे. गीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी हे गाणे संगीतबद्ध केलेले आहे. तसेच उमेश जाधव ह्यांचे नृत्य दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळी हिच्या ‘फुलवंती’च्या रूपातील अदाकारी शीर्षकगीताला चारचांद लावले आहेत.
फुलवंती…. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे. पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत… ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती 11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे. दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांनी केलं आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत.