तोपर्यंत असंच चालू राहील… अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची गौतमी पाटील हिच्यावर सडकून टीका

| Updated on: Apr 10, 2023 | 7:49 AM

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर टीका केली आहे. जोपर्यंत बघणारे तिचे नृत्य पाहतील. तिला गलेलठ्ठ मानधन देऊन आणलं जाईल, तोपर्यंत हे असंच चालणार आहे, असं प्रिया बेर्डे यांनी म्हटलं आहे.

तोपर्यंत असंच चालू राहील... अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची गौतमी पाटील हिच्यावर सडकून टीका
priya berde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावरील टीका थांबता थांबताना दिसत नाही. गौतमी पाटील हिच्या नृत्यावरून सातत्याने टीका होत आहे. तिचं नृत्य अश्लील असल्याचं सांगितलं जात आहे. माफी मागितल्यानंतरही गौतमीवरील टीका थांबलेली नाही. मध्यंतरी तर इंदुरीकर महाराज यांनी गौतमीच्या मानधनावरही टीका केली होती. परवाच ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनीही गौतमी पाटीलच्या मानधनावर टीका केली होती. हे कमी की काय आता अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही गौतमी पाटीलच्या नृत्यावर आणि लावणीवर टीका केली आहे. जोपर्यंत बघणारे थांबणार नाहीत. तोपर्यंत हे असंच चालू राहील, अशी टीका प्रिया बेर्डे यांनी केली आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रिया बेर्डे पहिल्यांदाच सांगलीत आल्या होत्या. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी गौतमी पाटील हिच्या नृत्यावर टीका केली आहे. या सर्व गोष्टीला बघणारेच जबाबदार असल्याचं प्रिया बेर्डे यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारची गाणी ऐकणारे, तमाशा चवीने बघणारे जोपर्यंत ते बंद करत नाहीत, तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत. आम्ही आणि राज्यकर्ते कितीही ओरडून आणि निषेध करून काही होणार नाही, असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

आम्ही बोलणारच

लोक खूप मानधन देऊन त्यांना आणतात. आम्ही काही बोललो की ट्रोल केलं जातं. याचा अर्थ असं नाही की आम्ही बोलणार नाही. आम्ही बोलणार. पण लोक जोपर्यंत काहीबाही बघणं बंद करत नाहीत. तोपर्यंत या गोष्टी चालणारच, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रिया बेर्डे यांच्या टीकेवर गौतमी पाटीलने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. गौतमी त्यावर काय बोलते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

घुंगरूचा टिझर लॉन्च

दरम्यान, गौतमी पाटील हिच्या पहिल्यावहिल्या घुंगरू या मराठी सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे. घुंगरू या सिनेमाचे चित्रीकरण महाराष्ट्रासह परराज्यात झालं होतं. सोलापूर जिल्ह्यात या सिनेमाचं सर्वाधिक चित्रीकरण झालं. लोककलावंतांच्या समस्यांवर आधारीत असलेला हा सिनेमा महिनाभरात प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केलंय. तर सिनेमात गौतमीची प्रमुख भूमिका आहे. आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमाची गौतमीला प्रचंड उत्सुकता आहे. तिच्यासह तिच्या चाहत्यांनाही तिच्या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.