सैराट सिनेमानंतर रिंकू राजगुरूचं आयुष्य बदललं. सामान्य घरातील मुलगी ते अभिनेत्री रिंकू राजगुरू असा तिचा प्रवास सैराट सिनेमानंतर सुरु झाला. पण आजही रिंकू राजगुरुला एका गोष्टीची खंत आहे. ते म्हणजे तिला शालेय जीवन, कॉलेजचं जीवन जगता आलं नाही. एका मुलाखती दरम्यान रिंकू याबाबत बोलती झाली. मी सातवीत असताना सैराट सिनेमा आला. त्यानंतर शाळेत फारसं जाणं झालं नाही. कॉलेजमध्येही मी जाऊ शकले नाही. त्यामुळे मित्र- मैत्रिणी त्यांचायसोबतची मजा मस्ती मला अनुभवता आलं नाही. हे कुठेतरी मनात राहून गेलंय, असं रिंकू म्हणाली.
सैराट सिनेमा झाल्यानंतर बरेच बदल झाले. जे की खूप चांगले आहेत. पण काही गोष्टी मी आजही मिस करते. कॉलेजमध्ये असताना मैत्रिणींसोबत फिरणं. गप्पा मारणं. बाहेर कुठे जाणं हे सगळं मला करात आलं नाही. कुणी मुलगा आवडणं, क्रश… त्यावरून मैत्रिणींना चिडवणं हे सगळं झालंच नाही. त्यामुळे माझे फारसे मित्र मैत्रिणी देखील नाहीत. याची मनात कुठेतरी खंत आहे, असं रिंकू राजगुरु हिने एका मुलाखतीत सांगितलं.
सैराट सिनेमाच्या शुटिंगच्या आधी मी ‘आटपाट’च्या टीमसोबत राहिले. आम्ही सगळेच एकत्र राहिलो. सिनेमा रिलीज झाल्यानंतरही बराच काळ आम्ही सगळे एकत्र होतो. कुठे जायचं काय करायचं याचे निर्णय नागराजदादा घ्यायचा. वाचन त्याच्यामुळे सुरु झालं. तो कायम सांगायचा की तुम्ही वाचलं पाहिजे. नवीन गोष्टी पाहिल्या पाहिजेत. बाबाही म्हणायचे नागराजदादा सांगतोय तर तू केलंच पाहिजे, असं रिंकू म्हणाली.
सैराटनंतर मी शाळेकडे लक्ष दिलं. तीन वर्षे कोणताही सिनेमा केला नाही. त्यानंतर मी मग पुढचा सिनेमा केला. माझी मतं मी घरच्यांना सांगू लागले. नागराजदादा आणि घरच्यांना सांगितलं की मी करून बघते फार- फार तर सिनेमा चालेल किंवा चालणार नाही. पण ते केलं पाहिजे, असं मी घरच्यांना सांगितलं. त्यांनी पण ते ऐकलं. त्यामुळे पुढेचे सिनेमे मी करू शकले, असं रिंकूने सांगितलं आहे.