मुंबई : आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेह-यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी एवढं लिलया साकारलं आहे की साक्षात दिघे साहेबच पडद्यावर बघितल्याचा भास होतोय अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटत आहेत. याच धर्मवीर मु. पो. ठाणे चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशन सोहळा मुंबईत अनेक मान्यवर आणि चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंसोबतच्या आठवणी जागवल्या.
याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी आनंद दिघे साहेबांसोबत एका दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी मी पाहिले होते ते काम करताना तहानभूक विसरुन काम करत असत. प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या सारखे काम करावे. ते प्रत्येकाला प्रेमाने व आपुलकीने जवळ करत. असा नेता पुन्हा होणे नाही. ज्या वेळी ते गेले त्यावेळी त्यांचे वयं पन्नास होते. मी म्हणेन या पन्नास वर्षांत ते शंभर वर्षांचे आयुष्य जगले. चोवीस तास ते कामाला वाहिलेले होते. त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य जाणून घेण्यासाठी ‘धर्मवीर’ जरूर पाहावा ”
मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात अभिनेते प्रसाद ओक लुकमध्ये मंचावर अवतरले आणि त्यांना बघून उपस्थित असलेले सर्वच जण अवाक् झाले. यावेळी अभिनेता प्रसाद ओक म्हणाला की, “एक कलाकार म्हणून आयुष्यात मनाजोगी भूमिका साकारायला मिळणे, हे फार कमी कलाकारांच्या नशिबात असते. आजवर मी प्रसाद ओक म्हणून अभिनय केला. ‘धर्मवीर’मध्ये मी अशी व्यक्तिरेखा साकारली आहे. जी काही वर्षांपूर्वी हयात होती. हे एक राजकारणातील महान व्यक्तिमत्व होते. ज्यांचे सामाजिक स्थानही तितकेच भक्कम होते. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही याची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांवरून मी या व्यक्तिरेखेला हुबेहुब साकारल्याचा आनंद आहे. मात्र ती साकारण्यासाठी मला साहेबांच्या कुटुंबियांची, निकटवर्तीयांची बरीच मदत झाली. जेव्हा मी या चित्रपटाचे शूटिंग करत होतो तेव्हा मला अनेकदा असे वाटायचे, तो मी नव्हेच. आरशात पाहताना मला आनंद दिघेंचाच भास व्हायचा. याचे सारे श्रेय ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांना जाते.”
एकनाथ शिंदे म्हणाले, ” ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या गाण्यांना प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिला आहे. आनंद दिघे यांचे विचार जसे भव्यदिव्य होते तसाच भव्यदिव्य हा चित्रपटही आहे. ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटाचे मोठे मोठे होर्डिंग्ज लागतात. तसेच होर्डिंग्ज आता मराठी चित्रपटाचेही लागत आहेत. नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आपली चांगली जागा निर्माण करेल.”
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. ह्या लोककारणी धर्मवीराला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने सजलेला, झी स्टुडिओज, मंगेश देसाई आणि साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट येत्या 13 मे रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.