बहुचर्चित ‘धर्मवीर 2’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या ट्रेलरमधून ‘धर्मवीर 2’ सिनेमाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ‘धर्मवीर 2’ या सिनेमात अभिनेता प्रसाद ओक याने दिवंगत नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाच्या ट्रेलमधील डायलॉगने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या संघटनेचा माज आहे भगवा रंग… सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे, भगवा रंग. छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता, हा भगवा रंग आणि कुणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग…, असा डायलॉग आनंद दिघे अर्थात प्रसाद ओक म्हणताना या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
येत्या 9 ऑगस्टला ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.’धर्मवीर 2’या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिलं आहे.
आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहे. आपल्या लोककारणी नेत्याला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. ‘धर्मवीर’ या चित्रपटला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले आणि त्यांच्या आठवणी या पुन्हा एकदा नव्याने जाग्या झाल्या. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका अतिशय उत्कृष्ट होती. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता ‘धर्मवीर 2’ ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. ‘धर्मवीर’ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता ‘धर्मवीर 2’ चित्रपटातील गाणी पाहिल्यावर चित्रपटाचं कथानक, कलाकार यविषयाची लोकांना असलेली उत्सुकता खूपच वाढली आहे.