‘गूगल आई’ सिनेमातील नवं गाणं रिलीज; देवाला साद घालणाऱ्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

| Updated on: Jul 21, 2024 | 8:39 PM

Google Aai Movie Deva Deva Song Release : 'गूगल आई' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. त्यानंतर या सिनमाबाबतची उत्सुकता वाढली आहे. देवाला साद घालणाऱ्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 'देवा देवा' हे गाणं रिलीज झालंय. वाचा सविस्तर...

गूगल आई सिनेमातील नवं गाणं रिलीज; देवाला साद घालणाऱ्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
'गूगल आई' चित्रपट
Image Credit source: tv9
Follow us on

डॉलर्स मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि गेहिनी रेड्डी प्रस्तुत ‘गूगल आई’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेम, वेदना, दुःख, संघर्ष, साहस हे सगळंच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील एक भावपूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘देवा देवा’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांचा आवाज लाभला आहे. आयुष्यातील संघर्ष आणि मनातील घालमेल व्यक्त करणाऱ्या या गाण्याला एस. सागर यांनी शब्दबद्ध केले असून संगीतही त्यांचेच लाभले आहे.

नवं गाणं रिलीज

प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, आणि सई रेवडीकर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे थेट मनाला भिडणारे आहे. तिघेही परिस्थितीशी झुंज देत असताना परमेश्वराला दिलेली साद या गाण्यात दिसत आहे. मनात रुजणारे हे गाणे संगीतप्रेमींना नक्की भावेल. दरम्यान, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकटांशी सामना करत कुटुंबाला सुखरूप बाहेर काढणाऱ्या एका छोट्या मुलीची ही गोष्ट आहे.

सिनेमात कोण-कोण कलाकार?

‘गूगल आई’ या सिनेमात प्रणव रावराणे, प्राजक्ता गायकवाड, सई रेवडीकर यांच्यासह माधव अभ्यंकर, अश्विनी कुलकर्णी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘गूगल आई’ या चित्रपटाचे निर्माते डॉलर दिवाकर रेड्डी आहेत. तर गोविंद वराह यांनी दिग्दर्शनासहित कथा, पटकथा लेखन केले आहे. येत्या 26 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाचे दिग्दर्शक गोविंद वराह यांनी या गाण्यावर भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील प्रेमगीत प्रदर्शित झाले होते. या गाण्याला संगीतप्रेमींनी पसंती दर्शवली. आता या चित्रपटातील भावनिक गाणे प्रदर्शित झाले असून मनाला भिडणाऱ्या या गाण्याला अवधूत गुप्ते सारख्या नामवंत गायकाचा आवाज लाभला आहे. एस. सागर यांच्या शब्दांनी आणि संगीताने या गाण्यात एक अनोखी आर्तता आणली आहे. या गाण्याला थोडा कव्वालीचा फील देण्यात आला आहे, त्यामुळे हे गाणे अधिकच श्रवणीय झाले आहे. मला खात्री आहे हे गाणेही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असं गोविंद वराह यांनी म्हटलं आहे.