मुंबई : सध्या पंजाबमध्ये आपचा (Aap) बोलबाला आहे. पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) चाणक्य (Chankya) म्हणून ज्यांची राजकारणात ओळख आहे, त्या संदीप पाठक (Sandeep Pathak) यांना आपने पंजाबमधून राज्यसभेचं (Rajyasabha) तिकीट दिलं आहे. पंजाबमध्ये (Punjab) आपची सत्ता येण्यात संदीप पाठक यांचा मोठा हात होता. पाठक यांनी राज्यसभेसाठी नामांकन अर्जही भरला आहे. पण या सगळ्यात मराठी अभिनेता संदीप पाठक (Marathi Actor Sandeep Pathak) चर्चेत आला आहे. ‘आप’ने राज्यसभेसाठी त्यांच्या पक्षाचे नेते संदीप पाठक यांच्या नावाची घोषणा केली. पण बऱ्याच ठिकाणी अभिनेता संदीप पाठकचा फोटो वापरला जातोय. त्यावर आता संदीप पाठकने प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी अभिनेता संदीप पाठकने आप उमेदवार म्हणून त्याचे फोटो वापरण्यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “तो मी नव्हेच! आप चे डॉ. संदीप पाठक ह्यांची पंजाबमधून राज्यसभेवर निवड झाली आहे माझी नाही. बऱ्याच ठिकाणी, काही चॅनल वर माझे फोटो वापरत आहेत. ‘आप’ल्याला ह्यात ओढू नका!”, असं ट्विट संदीप पाठक ने केलं आहे. यात त्याने आम आदमी पक्षाला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री,आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना टॅग केलंय.
संदीपच्या या ट्विटच्या कमेंटबॉक्समध्ये अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर काहींनी उपरोधाने संदीपचं अभिनंदन केलं आहे.
संदीप पाठकचं ट्विट
तो मी नव्हेच ? आप चे डॅा. संदीप पाठक ह्यांची पंजाब मधून राज्यसभेवर निवड झाली आहे माझी नाही. बऱ्याच ठिकाणी, काही चॅनल वर माझे फोटो वापरत आहेत. “आप”ल्याला ह्यात ओढू नका ? #Aap #sandeeppathak #Actorsandeeppathak @AamAadmiParty @ArvindKejriwal pic.twitter.com/93jwwaKMnl
— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) March 21, 2022
आपचे उमेदवार संदीप पाठक कोण आहेत?
आप नेते संदीप पाठक यांची पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकण्यात महत्वाची भूमिका होती. त्यांनी गेल्या तीन वर्षापासून पंजाबमध्ये तळ ठोकून बुथ लेव्हलला संघटना मजबूत केली होती. त्यामुळेच पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. ते आयआयटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते आपचे राष्ट्रीय संयोजक आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणूनही ते ओळखले जातात.
संबंधित बातम्या