मुंबई : बहुचर्चित ‘इर्सल’ (Irsal Movie) या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भलरी प्रॉडक्शन्सची निर्मिती, राज फिल्म्स प्रस्तुत इर्सल या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे (Aniket Bondre) आणि विश्वास सुतार (Vishwas Sutar) यांनी केले आहे. ‘राजकारणात गुलालाशिवाय मजाच नाय!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘इर्सल’ चित्रपटाचा फर्स्ट लुक अतिशय लक्षवेधी असून चित्रपटाचे हटके नाव आणि उत्कंठावर्धक पोस्टर यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ‘इर्सल’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये गुलालाची उधळण दिसते, त्यामध्ये एका व्यक्तीचा हात असून त्या हातात पिस्टल दिसत आहे. पोस्टरच्या खालच्या बाजूला झोपडपट्टीसारखा परिसर आणि काही उंच इमारती तसेच कबुतरांचा थवा दिसतोय.
भलरी प्रॉडक्शनची पहिली निर्मिती आणि राज फिल्म्स प्रस्तुत ‘इर्सल’ या चित्रपटाचे निर्माते विनायक आनंदराव माने आहेत. ‘इर्सल’ चित्रपटातून विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, अभिनेत्री माधुरी पवार यांच्यासह सुजाता मोगल, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत.
चित्रपटाची टॅग लाईन, पोस्टर यावरून चित्रपटाच्या कथेचा नेमका अंदाज लावता येत नाही. ‘इर्सल’ या शब्दाचा अर्थ इर्षा असल्यामुळे ‘इर्सल’ हा मराठी चित्रपट शहरी, निमशहरी किंवा मोठ्या महानगरातील राजकारण आणि गुन्हेगारी विश्वाभोवती फिरणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.
‘इर्सल’ चित्रपटाची कथा अनिकेत बोंद्रे यांची असून पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची आहे. संवाद विश्वास सुतार यांचे तर गीत- संगीत दिनकर शिर्के यांनी दिले आहे. ‘इर्सल’चे छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता म्हणून संजय ठुबे यांनी जबाबदारी पार पाडली आहे. तसेच चित्रपटाचे संकलन संतोष गोठोसकर, ध्वनी पियुष शाह, कला सिद्धार्थ तातूसकर, नृत्य धैर्यशील उत्तेकर, वेशभूषा सोनिया लेले – सहस्त्रबुद्धे, रंगभूषा सुहास गवते व महेश बराटे, केशभूषा दीपाली ढावरे यांनी केले आहे. फर्स्ट लुक मुळे चर्चेत आलेला ‘इर्सल’ येत्या 3 जून 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
Dharmaveer: ‘धर्मवीर’ चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता; पहा खास लूक
Video: ..अन् एकनाथ शिंदे झाले भावूक; मंचावरच प्रसाद ओकच्या पाया पडले