मुंबई | 19 मार्च 2024 : कलाकारांचं प्रोफेशनल लाईफसोबतच त्यांचं पर्सनल लाईफही चर्चेत असतं. त्यांच्या खासगी आयुष्यातील घटनांबाबत जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर त्याच्या कामासोबतच त्याच्या पर्सनल लाईफमधील घटनांमुळे आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत असतो. काही दिवसांआधी सिद्धार्थने त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाची पोस्ट शेअर केली. त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत आणि त्याच्या दुसऱ्या वडिलांबाबत त्याने स्पष्ट मत मांडलं आहे.
ज्यांनी मला जन्म दिला ते सध्या कुठे आहेत हे मला नाही माहीत… पण ते माझे बाबा होते. माझ्यासाठी ते एकच बाबा आहेत. माझ्या वडिलांचा आणि माझा काहीचं संपर्क झाला नाही.आजही ते कुठे आहेत ते मला नाही माहीत. पण बाकी कुणाला मी बाबा म्हणू इच्छित नाही. त्यांना मी बाबांची जागा नाही देऊ शकत, असं सिद्धार्थ म्हणाला. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. त्यांचं आणि माझं नातंही खूपच छान आहे. त्यामुळे मी त्यांना काय नावाने हाक मारतो. याने तसा काही फरक पडत नाही, असं सिद्धार्थ म्हणाला.
मिताली मला म्हणते की तू माझ्या वडिलांना बाबा म्हण… पण मी नाही म्हणू शकत. त्या माझ्या भावना आहेत. फक्त हे एकच नातं नाही. तर मी माझ्या आईला सोडून कुणाला आई म्हणत नाही. माझ्या सख्ख्या ताईला सोडून मी कुणाला ताई नाही म्हणत. त्या माझ्या भावना आहेत. ताई माझ्यासाठी एकच आहे. आई माझ्यासाठी एकच आहे. तसं वडीलही माझ्यासाठी एकच आहेत. त्यामुळे मी त्यांना काका म्हणतो,असं सिद्धार्थने एका मुलाखतीत सांगितलं.
आईच्या दुसऱ्या लग्नाविषयी सिद्धार्थ उघडपणे बोलतो. तो म्हणतो की मी मागची कित्येक वर्षे माझ्या आईला इतकं खुश नव्हतं पाहिलं. पण आता लग्नानंतर ती प्रचंड आनंदी आहे. तिला आनंदी बघून मलाही खूप जास्त आनंद होतो. तिला असंच कायम आनंदी बघायचं आहे, असं सिद्धार्थ म्हणतो.