मुंबई | 17 मार्च 2024 : मुंबईमध्ये स्वत:चं हक्काचं घर असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. मुंबईत येणारा प्रत्येकजण स्वत:च्या घराचं स्वप्न उराशी बाळगून असतो. सिने क्षेत्रात काम करण्यासाठी येणाऱ्या कलाकारही अनेक स्वप्न घेऊन या स्वप्ननगरीत येतात. प्रचंड मेहनतीच्या जोरावर ती पूर्णही करतात. असंच एक नाव म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर… मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही सईने नाव कमावलं आहे. या सगळ्यात सईने तिच्या पर्सनल लाईफमध्येही मोठी ॲचिव्हमेंट मिळवली आहे. सईने मुंबईत अलिशान घर खरेदी केलं आहे. या घराचे खास व्हीडिओही सईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काही दिवसांआधी सईने नवं घर घेत असल्याचं जाहीर केलं. जुन्या घरातून नव्या घरात जात असतानाचा व्हीडिओ सईने शेअर केला. यात तिने जुन्या आणि नव्या घराबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे माझं 11 वं घर आहे. याआधी दहा घरांमध्ये राहिली आहे. घर म्हणजे माझ्यासाठी एक भावना आहे. भिंतींनी घर बनत नाही तर त्या घरात राहणाऱ्या माणसांमुळे घर बनतं. या माझ्या घराने माझं यश पाहिलंय. माझं अपयशही पाहिलीय. या घराशी मी अनेकदा गप्पा मारल्यात… माझ्या हितगुजाच्या गोष्टी मी या घराला सांगितल्या आहेत. हे घर सोडणं माझ्यासाठी प्रचंड कठीण आहे. मात्र कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी निघावं लागणार आहे, असं जुनं घर सोडताना सई म्हणाली.
नव्या घराचा व्हीडिओही सईने शेअर केलाय. यात तिने हे घर तिच्यासाठी किती महत्वाचं आहे, हे सांगितलं आहे. नवं घरं घेणं सगळ्यांसाठीच एक स्वप्न असतं. तसं ते माझ्यासाठीही होतं. सांगलीतून मुंबईत आल्यावर मी ते स्वप्न पाहिलं होतं. मात्र ते कसं पूर्ण होणार आहे हे मला माहिती नव्हतं. खूप मेहनत घेतली. त्यानंतर हे घर खरेदी केल्याचं सई म्हणाली.
हे नवं घर अजूनही माझं असल्यासारखं वाटत नाही. असं वाटतं की उद्या या घरातून चेकआऊट करून बाहेर जावं लागणार आहे. हे घर मला प्रचंड आवडलंय. माझ्या आवडीनुसार मी हे घर सजवलं आहे. मला मोठी झाडं आवडतात. तशी झाडं मी या घरात ठेवली आहेत. मला स्वत:चा प्रचंड अभिमान वाटतो. जर सई तिचं स्वप्न पूर्ण करू शकते, तर तुम्हीही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता, असं सई म्हणाली.