मराठी सिनेमांचा इतिहास पाहता यात ठळकपणे उठून दिसणाऱ्या सिनेमांमध्ये माहेरची ‘माहेरची साडी’ या सिनेमाचा वरचा नंबर लागतो. हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला. तेव्हापासून आतापर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या सिनेमाची गोष्ट तेव्हा गाव खेड्यातील महिलेलाही जवळची वाटली. सिनेमातील गाण्यानी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर या सिनेमाचे दिग्दर्शक विजय कोंडके यांचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लेक असावी तर अशी’ हा सिनेमा 26 एप्रिलला रिलीज होणार आहे.
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर निर्माता-दिग्दर्शक विजय कोंडके यांनी 34 वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. विजय कोंडके यांची निर्मिती, दिग्दर्शन असलेला ‘लेक असावी तर अशी’ हा मराठी चित्रपट 26 एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. ‘ज्योती पिक्चर्स’ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेन्टची प्रस्तुती असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.
सोंगाड्या, पांडू हवालदार, बोट लावीन तिथं गुदगुल्या, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, आली अंगावर यांसारख्या दादा कोंडके यांच्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या वितरणामध्ये विजय कोंडके यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनातील भाव ओळखून त्यानुसार यशस्वी चित्रपट निर्मिती करण्याची गुरुकिल्ली विजय कोंडके जाणून आहेत. त्याच धर्तीवर ‘लेक असावी तर अशी’ हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
विजय कोंडके हे नाव घेतलं की, ‘माहेरची साडी’ हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या मराठी चित्रपटाने यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले.
निर्माते-वितरक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर आपणही कधीतरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसून आपल्या मनातील सिनेमा बनवण्याची इच्छा त्यांच्या मनात आली. दादा कोंडके यांनी दिलेल्या संधीमुळे मी ‘माहेरची साडी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य उचललं. या चित्रपटाने मला रसिकांचे अमाप प्रेमही मिळवून दिले. रसिकांच्या याच प्रेमापोटी ‘लेक असावी तर अशी’ हा नवा मराठी चित्रपट मी 26 एप्रिलला घेऊन येतोय, असं विजय कोंडके यांनी म्हटलं.