मनोज जरांगे पाटील… मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलनकर्ते… आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभं केलं. या आंदोलनाने महाराष्ट्रातील मराठा समाज पुन्हा एकदा एकवटला. या लढ्याचा महाराष्ट्र साक्षीदार आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यावर त्यांच्या जीवनावर एक सिनेमा येतो आहे. ‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या 26 एप्रिलला हा ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करणारी अनेक गाणी आजवर आली आहेत. त्यात आता ‘जय देव जय देव शिवराया’ या गाण्याची भर पडली आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील गाणं रिलीज झालं आहे. संघर्षयोद्धा चित्रपटात हे गाणं पाहायला मिळणार आहे. येत्या 26 एप्रिल रोजी संघर्षयोद्धा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनाचा वेध ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा आहे. या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर रिलीज झालं आहे. तसंच ‘उधळीन जीव’ , ‘मर्दमावळा-शिवरायांचा वाघ’ या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करणारं गाणं प्रदर्शित झालं आहे. उत्तम शब्द, ताल धरायला लावणारं संगीत ही या गाण्याची वैशिष्ट्ये आहेत. तर गायक आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज या गाण्याला लाभला आहे.
‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील याने साकारली आहे. तर या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकार दिसणार आहेत. तर शिवाजी दोलताडे यांनी ‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.