एकामागोमाग एक आशयघन चित्रपट येत असताना आता पुन्हा एकदा गावरान तडका असलेली मराठमोळी अशी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आजवर इतिहासात अनेक जोड्या अजरामर झाल्या आणि या जोड्यांनी प्रेम या शब्दाची व्याख्या तयार केली. अशीच एक गावाकडील लव्हस्टोरी ‘राजराणी’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बरं ही प्रेमकहाणी नुसतीच प्रेमकहाणी नसून एक थरारक चित्र डोळ्यासमोर उभी करणारी आहे. येत्या 4 ऑक्टोबरला हा सिनेमा संपूर्ण प्रेमीयुगुलांवर राज्य करायला सज्ज होत आहे. ही एक सत्य घटनेवर आधारित प्रेमकहाणी आहे .
अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे या दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. रोहन पाटील याने याचा ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात रोहन पाटीलने मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली होती. आता नव्या सिनेमाच्या माध्यामातून रोहन पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
शहरातील प्रेमकहाणीला डोळ्यासमोर ठेवून आता खेड्यापाड्यातही याचं प्रमाण वाढलेलं चित्र दिसत आहे. अशावेळी समाजाकडून होणारा विरोध, कुटूंबाकडून मिळणारा नकार आणि यावेळी प्रेमीयुगुलांनी घेतलेला निर्णय याचे हुबेहूब वर्णन राजाराणी या चित्रपटातून लवकरच पाहायला मिळणार आहे. अभिनेता रोहन पाटील आणि अभिनेत्री वैष्णवी शिंदे ही जोड़ी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. याशिवाय भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे, सूरज चव्हाण या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलंआहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे.