सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान पहिल्यांदाच दिसणार एकत्र; नवा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज

| Updated on: Jul 18, 2024 | 8:15 PM

Subodh Bhave and Tejashri Pradhan New Movie : अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीच्या सिनेमांपेक्षा या सिनेमाची गोष्ट जरा हटके आहे. 'हॅशटॅग तदेव लग्नम' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. वाचा सविस्तर...

सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान पहिल्यांदाच दिसणार एकत्र; नवा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज
सुबोध भावे, तेजश्री प्रधान
Image Credit source: Instagram
Follow us on

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. तेजश्री आणि सुबोध यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हा त्यांचा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. नुकतंच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या मोशन पिक्चरमुळे या सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे. येत्या 4 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची गोष्ट नेहमीच्या सिनेमाहून जरा वेगळी आहे. नात्यांमधील परिपक्वता या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज

‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हे नाव ऐकूनच जरा विचारात पडला असाल ना? हॅशटॅग हा आजचा ट्रेंडिंगमधला शब्द आहे तर तदेव लग्नम हा संस्कृत शब्द त्यामुळे या दोघांचा परस्परांशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावत असतील. हीच उत्सुकता कायम ठेवत, हा भन्नाट विषय घेऊन तरुणाईला आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ सज्ज झाला आहे.

कलाकार कोण-कोण?

शुभम फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान प्रमुख भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केलं आहे. या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत. मोशन पोस्टर पाहून यात लग्नातील धमाल पाहायला मिळणार आहे, हे कळतंय. परंतु आता हे ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 4 ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान हे प्रथमच एकत्र येत आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद गोखले यांनी या सिनेमाच्या कथेवर भाष्य केलं आहे. ‘तदेव लग्नम’ ज्यांचा भावार्थ अर्थ असा की, तेच हे एकत्र येणे. आता हेच शीर्षक या चित्रपटासाठी का, हे जाणून घेण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता एवढेच सांगेन की, हा एक धमाल चित्रपट आहे, असं ते म्हणालेत.

एका परिपक्व नातेसंबंधावर बेतलेली ही गोड कथा आहे. आपल्यापैकी अनेकांना ही कथा स्वतःच्या आयुष्याशी मिळतीजुळती वाटेल. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, तांत्रिक बाबी या सगळ्याच जमेच्या बाजू आहेत. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे, असं निर्माते शेखर मते यांनी म्हटलं आहे.