मुंबई : कुणी कुठल्याही क्षेत्रात कितीही उंचीला पोहोचलं तरी आपल्या खास मित्रांची जागा आपल्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात असते. अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale Passaed Away) आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची मैत्रीही अशीच होती. हे दोघेही कॉलेजपासूनचे मित्र… त्यामुळे त्यांची मैत्री जितकी घट्ट तितकेच त्यातील किस्से रंजक!
विक्रम गोखले पुण्याच्या गरवारे कॉलेज शिकत होते. तेव्हा विलासराव देशमुख उच्च शिक्षणानिमित्त पुण्यात आले. त्यांनीही गरवारे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. यावेळी आधी दोघांची ओळख आणि मग मैत्री झाली. हळूहळू त्यांची मैत्री बहरत गेली. दोघेही एकत्र पुण्याच्या रस्त्यांवर फिरायचे.
विक्रम गोखलेंना अभिनयसह राजकारणाची आवड होती. तर विलासरावांना राजकारणासह कलासृष्टी आकर्षित करायची. त्यामुळे दोघांचे सूर जुळले.
गरवारे कॉलेजला शिकत असताना विलासराव देशमुखांकडे जावा गाडी होती. तेव्हा दोघे या गाडीवरून पुण्याच्या विविध भागात फेरफटका मारायचे. त्या काळात ते दोघेही एकदा मैत्रिणीला भेटायला गाडीवरून गेल्याचा किस्सा गोखलेंनी एकदा सांगितला होता.
लातूरला गेल्यावर विक्रम गोखले हमखास विलासराव देशमुखांच्या घरी जायचे. मग पुन्हा जुन्या आठवणींमध्ये दोघे रंमायचे आणि गप्पांचा फड रंगायचा.
पुढे विक्रम गोखले यांनी अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळवला. तर विलासराव राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण तरी दोघाच्या मैत्रीतील ओलावा मात्र कायम राहिला. विलासराव मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या भेटी होत राहिल्या. या भेटींदरम्यान कॉलेजच्या जीवनातील आठवणींना उजाळा जरूर मिळायचा.