मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी (Sulochana Didi) यांचे काल निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपले. त्यांच्या निधनामुळे सर्वजण व्यथित झाले आहेत. सुलोचना दीदी म्हणजे शालिनता, सोज्वळता, वात्सल्याचे रुप.. भारतीय सिनेमाच्या पडद्यावरील सोशिक आई आज आपण गमावली अशीच सर्वांची सामूहिक भावना त्यांच्याबद्दल उमटते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही त्यांना आदरांजली वाहिली आहे. ‘अशी आई होणे नाही…’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रदीर्घ काळापर्यंत मराठी – हिंदी सिने सृष्टीत आपल्या अभिनयाने नावाचा दबदबा कायम राखण्यात सुलोचना दीदी यशस्वी ठरल्या. त्यांच्या निधनानंतर अनेक दिगज्जांनी दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
काय म्हणाले राज ठाकरे ?
सुलोचना दीदींमध्ये ‘आईपण’ हे अंगभूत होतं , त्यामुळे पडद्यावर त्यांना विशेष मेहनत घेऊन अभिनय करावा लागला नाही, असे राज ठाकरे म्हणाले. वाचूया त्यांची पोस्ट त्यांच्याच शब्दांत..
सुलोचना दीदींचं निधन झालं. ‘दीदी’ ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे.
हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत ‘आई’ हे सिनेमातलं महत्वाचं पात्र असायचं. पण ‘आई’ पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केलं ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचना दीदींनी. बाकीची आईची पात्रं ही एकतर बालिश केली गेली आणि त्यांच्यात नकारात्मक छटा आणल्या गेल्या.
सुलोचना दिदींच्यात ‘आईपण’ हे अंगभूत होतं त्यामुळे त्यांना पडद्यावर भूमिका वठवताना विशेष अभिनय करावा लागलाच नाही. त्यामुळे त्यांच्या आईच्या भूमिका आयुष्यभर लक्षात राहिल्या. पण हिंदीत जितकं वैविध्य नाही मिळालं तितकं वैविध्य त्यांना मराठी सिनेमांत मिळालं, हे मराठी सिनेमाचं भाग्य.
एखादी भूमिका प्रेक्षकाला इतकी विश्वासार्ह वाटावी असा योग दुर्मिळ असतो जो सुलोचना दीदींच्या वाट्याला आला होता. अशी ‘आई’ होणे नाही, अशी ‘दीदी’ होणे नाही.
सुलोचना दीदींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
सुलोचना दीदींचं निधन झालं. ‘दीदी’ ही उपाधी चिकटणं जितकं सोपं, तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा ह्यामुळे.
हिंदी सिनेमात ६०, ७० आणि ८० च्या… pic.twitter.com/cIevAG9gLM
— Raj Thackeray (@RajThackeray) June 4, 2023
आज होणार अंत्यसंस्कार
३०० हून अधिक मराठी हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या सुलोचना लाटकर यांच्या सुलोचना दीदी या नावानेच सर्वांना परिचित आहेत. 30 जुलै 1929 साली त्यांचा जन्म झाला. चिमुकला संसार सिनेमातून पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आल्या. ‘वहिनीच्या बांगड्या’ सिनेमामुळे खरी ओळख मिळाली. प्रपंच, मराठा तितुका मेळवावा, एकटी, मोलकरीण, सासुरवास हे सुलोचना दीदी यांचे गाजलेले चित्रपट आहेत. सुजाता, जॉनी मेरा नाम, कोरा कागज, कटी पतंग, बहारो के सपने, रेश्मा और शेरा हिंदीतील गाजलेले सिनेमे आहेत.
त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहताना लिहीलेली भावनिक पोस्ट चर्चेत आहे.