मुंबई : मराठी सिनेमांमध्ये नेहमीच आशयाला प्राधान्य दिलं जातं. आशय आणि दर्जेदार सादरीकरणाच्या बाबतीत मराठी चित्रपट श्रीमंत आहेत. आता मराठी सिनेमा निर्मितीच्या बाबतीतही श्रीमंत होऊ लागलाये. सातासमुद्रापार जाऊन शूट करण्याचं धाडसं निर्माते दाखवू लागले आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेला ‘येरे येरे पैसा 2’. 2018 साली प्रदर्शित झालेल्या संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा’ या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. संजय नार्वेकर, मृणाल कुलकर्णी, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे ही सगळी मंडळी पहिल्या भागात होतीच आता दुसऱ्या भागात त्यांच्या सोबतीला प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, स्मिता गोंदकर, मृण्मयी गोडबोले अशी कलाकारांची भलीमोठी फौज आहे. निर्माता अमेय खोपकर यांनीही यंदा दिग्दर्शनाची जबाबदारी संजय जाधव ऐवजी हेमंत ढोमेवर सोपवली आहे. आता मराठीतले हे सगळे दिग्गज एकत्र आल्यावर विचार करा काय धमाल उडेल. ‘येरे येरे पैसा 2’ मध्ये याची प्रचिती तुम्हाला येईल. जर का हा सिनेमा तुम्ही कुठलंही लॉजिक न लावता बघितला तर तुमचं चांगलंच मनोरंजन होईल. हा आता सिनेमात अनेक बाळबोध आणि हास्यास्पद प्रसंगांची पेरणी केली आहे. पण सिनेमा इतका चकाचक झाला आहे, की तुम्ही या बाळबोधपणाकडे कानाडोळा कराल.
पहिल्या भागातील भाई अण्णा (संजय नार्वेकर) आता दक्षिण अफ्रिकेवरुन परत आलाय. अण्णा जरी आफ्रिकेतून परत आला असला, तरी तिकडे हवा तसा पैसा न कमवता आल्याने निराश असतो. त्यात त्याची बायको रंजना (विशाखा सुभेदार) एक विचित्र अट त्याच्यासमोर ठेवते. या सगळ्या पेचात सापडला असतांना निरज शहा (पुष्कर श्रोत्री) 10 हजार कोटींचा घोटाळा करुन लंडनला पसार होतो. आता निरजनं ज्या मॅडमचे (मृणाल कुलकर्णी) 10,000 कोटी लंपास केले असतात, त्या निरजला पकडून परत भारतात आणण्याची जबाबदारी अण्णावर सोपवतात. त्याबदल्यात त्या अण्णाला 100 कोटींची ऑफर देतात. आता निरजला परत भारतात आणण्यासाठी आण्णा आपली टीम बनवतो. हर्ष (अनिकेत विश्वासराव), जॉंगे (प्रियदर्शन जाधव), प्रद्युम्न (आनंद इंगळे) आणि सारा (मृण्मयी गोडबोले) यांना घेऊन आण्णा निरजला भारतात परत आणण्याच्या मिशनवर निघतो. भारतातून हे सगळे अवलिये लंडनला पोहोचतात. तिथे त्यांची ओळख कंट्री (प्रसाद ओक) आणि काव्याशी (स्मिता गोंदकर) होते. निरजला भारतात आणण्याच्या मिशनसाठी हे सगळे अवलिये सर्वोतोपरी प्रयत्न करतात. आता ते काय क्लुप्त्या लढवतात? निरज शहाला ते आपल्या सापळ्यात अडकवतात का? की निरजचं त्यांना आपल्या सापळ्यात अकडवतो? घोटाळ्याचा खरा मास्टर माईंड कोण असतो? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा बघावा लागेल.
सिनेमाची कथा हेमंत ढोमेचीच. कथेत कुठलंही नाविन्य नसलं, तरी हेमंतनं सिनेमाची गती भन्नाट ठेवलीये. पण सिनेमात बऱ्याच ठिकाणी अब्बास-मस्तान स्टाईल धक्कातंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सिनेमा थोडा गंडला. जर अॅक्शन-कॉमेडी हाच जॉनर निर्मात्यांनी कायम ठेवला असता तर कदाचित हा सिनेमा अजून प्रभावशाली झाला असता. बरं सिनेमातील गूढ जर सशक्त पटकथा लिहून अजून गडद केलं असतं, तर मज्जा आली असती. पण, इथे तर बऱ्याच प्रसंगात पुढे काय होईल याचा अंदाज सूजाण प्रेक्षकांना लगेच येईल. सिनेमाची निर्मितीमूल्ये उत्तम आहेत. सिनेमातले काही सीन्स खरोखरचं डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत. निर्माता म्हणून अमेय खोपकर यांनी कुठलीही कसर सोडली नाही. जर या सिनेमाला यश मिळालं, तरच इतर निर्माते भविष्यात ही रिस्क घेण्याचं धाडस करतील.
सिनेमाचा फर्स्ट हाफ धमाल झालाये. मध्यांतरानंतर मात्र दिग्दर्शकाची सिनेमावरील पकड सुटली. हेमंतनं जर कथेतील विस्कळीतपणा टाळला असता, तर या सिनेमानं वेगळी उंची गाठली असती. मध्यांतरानंतर सिनेमात बऱ्याच प्रसंगांमध्ये गोंधळ उडालेला दिसतो.
परदेशातील चकाचक रस्त्यांवर गाड्यांचा चेसिंग सिक्वेन्स, हिरोईन्सची ‘धाकड’ गर्ल स्टाईल हाणामारी, ग्लॅमरसोबतच हॉटनेसचा तडका यासारख्या अनेक गोष्टी मराठी सिनेमात बघतांना खरंच बरं वाटतं. सिनेमात बरेच बाळबोध प्रसंगही आहेत, पण जर त्याकडे कानाडोळा केला तर नक्कीच हा सिनेमा तुम्हाला निराश करणार नाही. अण्णाच्या भूमिकेत संजय नार्वेकरनं धमाल केली आहे. संजयचा अण्णा या भागात फुल टू फॉर्ममध्ये आहे. त्याला तेवढीच जबरदस्त साथ दिलीये प्रद्युम्न अर्थात आनंद इंगळे आणि जॉंगो अर्थात प्रियदर्शन जाधवनं. तिघांची भन्नाट जुगलबंदी सिनेमात रंगलीये. पुष्कर श्रोत्रीनंही निरज शाह उत्तम वठवलाये. प्रसाद ओक, मृण्मयी गोडबोले, अनिकेत विश्वासराव, विशाखा सुभेदार यांनीही त्यांच्या पात्रात धमाल केलीये. मृणाल कुलकर्णींचा रोल सिनेमात छोटा असून त्यांच्या वाट्याला विशेष करण्यासारखं काही नाही. स्मिता गोंदकर सिनेमात कमालीची गोड दिसली आहे. तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकमूळे सिनेमा बघतांना तिच्यावरुन अजिबात नजर हटत नाही. सगळ्याच कलाकारांनी सिनेमात फुल टू बॅटिंग केली आहे.
सिनेमाचं संगीतही थिरकायला लावणारं आहे. विशेषत: ‘अश्विनी ये ना’ गाण्याचं रिमिक्स व्हर्जन धमाल झालंय. सिनेमाची सिनेमॅटोग्राफीही उत्तम आहे. सिनेमाचा कॅमेऱ्यात कैद केलेला ‘श्रीमंत’पणा वाखाणण्याजोगा आहे. एकूणच काय तर जास्त विचार न करता हा सिनेमा बघितला तर नक्कीच तो तुम्हाला आवडेल. मध्यांतरानंतर जर कथेवर अजून जास्त काम केलं असतं, तर नक्कीच हा सिनेमा अजून उजवा ठरला असता. असो, या काही गोष्टीं सोडल्या तर मराठी सिनेमाची श्रीमंती अनुभवयाची असेल तर एकदा ‘येरे येरे पैसा 2’ बघायला हरकत नाही. या सिनेमाला ‘टीव्ही नाईन मराठी’कडून मी देतोय तीन स्टार्स…
पाहा ट्रेलर :