रिव्ह्यू : काश्मीरचं नवं रुप- नोटबुक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

Notebook review : काश्मिरमधील समस्येवर आतापर्यंत अनेक चित्रपट आले..अनेक प्रेमकथा दहशतवाद आणि धर्माचा रंग देत भडकपणे रंगवण्यात आल्या. काश्मिरमध्ये आजही लहान मुलं आणि युवकांना धर्माच्या नावाखाली भडकवून बंदूक हातात घ्यायला भाग पाडलं जातं. धर्माच्या नावाखाली भडकलं जातं. हे आतापर्यंत अगदी भडकपणे आपण अनेक मालिका-चित्रपटांमध्ये बघितलं आहे. मात्र ‘नोटबुक’मध्ये एका वेगळ्या प्रेमकथेसोबतचं काश्मिरमधील कुटुंबियांसाठी मुलांच्या हातात […]

रिव्ह्यू : काश्मीरचं नवं रुप- नोटबुक
Follow us on

Notebook review : काश्मिरमधील समस्येवर आतापर्यंत अनेक चित्रपट आले..अनेक प्रेमकथा दहशतवाद आणि धर्माचा रंग देत भडकपणे रंगवण्यात आल्या. काश्मिरमध्ये आजही लहान मुलं आणि युवकांना धर्माच्या नावाखाली भडकवून बंदूक हातात घ्यायला भाग पाडलं जातं. धर्माच्या नावाखाली भडकलं जातं. हे आतापर्यंत अगदी भडकपणे आपण अनेक मालिका-चित्रपटांमध्ये बघितलं आहे. मात्र ‘नोटबुक’मध्ये एका वेगळ्या प्रेमकथेसोबतचं काश्मिरमधील कुटुंबियांसाठी मुलांच्या हातात पुस्तक असायला हवं, बंदूक नाही हा संदेशही देण्यात आला आहे. इथेच या सिनेमाचं वेगळेपण दिसतं.

आतापर्यंत काश्मिरची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांमध्ये फक्त दहशतवाद, धर्माचं बेगडी राजकारण, काश्मिरमधील नयनरम्य स्थळांवर हिरो-हिरोईन्सचं रोमॅण्टिक गाणं हे गणित हमखास ठरलेलं. पण या सगळ्याला छेद देत दिग्दर्शक नितीन कक्कडनं केलेला हा वेगळा प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे. 2014 साली आलेला थाई चित्रपट ‘टीचर्स डायरी’चा ‘नोटबुक’ रिमेक आहे. चित्रपटाच्या कथानकातच दम असल्यामुळे चित्रपट कंटाळवाणा होणार नाही. सोबतीला काश्मिरचं सौंदर्यही चित्रपटातील एखाद्या पात्राप्रमाणेच सतत सोबत राहतं.

सगळ्यात आधी बॉलिवूडचा दबंग सलमान खानचं हा चित्रपट बनवल्याबद्दल अभिनंदन. चित्रपटाची हृदयस्पर्शी गोष्ट आणि त्यासोबतचं दिलेला मेसेज चित्रपटाला खऱ्या अर्थाने मोठा बनवतो. चित्रपटाची गोष्ट काश्मिरमधील एका तलावाच्या मधोमध असलेल्या वुलर पब्लिक स्कूलची आहे. ही गोष्ट कबीर आणि फिरदोसची आहे. ही गोष्ट वुलर पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या सहा चिमुरड्यांची आहे. लाईट, पाणी, साधं मोबाईलचं नेटवर्कही मिळत नसलेल्या या शाळेत फिरदोस मुलांना घरुन बोलवून आणून शिकवत असते. अचानक असं काही घडतं की फिरदोसला शाळा सोडून जावं लागतं. त्यानंतर मुलांना शिकवण्यासाठी कबीरला पाठवलं जातं. फिरदोस शाळा सोडून जातांना तिची ‘नोटबुक’ तिथेच विसरते आणि ती ‘नोटबुक’ कबीरच्या हातात पडते. नोटबुकमधून फिरदोसचा जीवनपट उलगडत जातो आणि नोटबुक वाचत असतांनाच कबीर फिरदोसच्या प्रेमात पडतो. कबीर आणि फिरदोसनं एकमेकांना बघितलेलंही नसतं तरी त्यांची ही निरागस प्रेमकथा फुलू लागते.आता फिरदोस आणि कबीर एकमेकांना भेटतात का? त्यांचं आयुष्य काय वळणं घेतं हे बघण्यासाठी तुम्हाला ‘नोटबुक’ बघावा लागेल.

सलमाननं या चित्रपटाद्वारे त्याच्या मित्राचा मुलगा जहीर इक्बाल आणि नूतन यांची नात आणि मोहनिश बहलची मुलगी प्रनुतनला लाँच केलं आहे. दोघांनीही सहज अभिनय केला आहे. विशेषत: प्रनुतननं आपल्या दमदार अभिनयानं मनं जिंकली आहेत. आपल्या पहिल्याच सिनेमात डीग्लॅमरस भूमिका साकारणं खरंतर आव्हानात्मक असतं. पण प्रनुतननं हे आव्हान लीलया पेललं आहे. खरंतर तिला ऑलरेडी घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. मात्र प्रनुतनने हा वारसा मागे सोडून अजून मेहनत घेतली तर ती नक्कीच लंबी रेस का घोडा ठरेल यात शंका नाही.

सहाही छोट्या मुलांनी कमाल कामं केली आहेत. बऱ्याच प्रसंगात त्यांचा निरागसपणा खरंच भावतो. कबीरसोबत त्यांची उडणारी धमाल मस्तचं. पण एवढं सगळं छान-छान असूनही सिनेमात बऱ्याच त्रुटी आहेत. कारण काही घटना अगदी पटापट संपतात. ते प्रसंग सिनेमा मोठा होऊ नये म्हणून उगाचच आटोपल्यासारखे वाटतात. तर काही प्रसंग अगदीच मनाला पटत नाही. सिनेमातील या छोट्या छोट्या गोष्टी टाळल्या असत्या तर ही नक्कीच सुंदर प्रेमकथा झाली असती.

चित्रपट छोटा आहे. उगाच सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली सिनेमा खेचण्याचा प्रयत्न नितीन कक्कडने केला नाही. काश्मिरमधील बर्फाच्छादित ठिकाणी हिरो-हिरोईनवर रोमॅण्टिक गाणं शूट करण्याचा अट्टहास नितीननं टाळला आहे. सिनेमा सुरु झाल्यावर रंगत असतांनाच मध्यांतर होतो. तेव्हा अरे इतक्या लवकर मध्यांतर झाला पण ? अशी प्रतिक्रिया नकळत उमटते. सलमान खाननं आतापर्यंत आपल्या प्रॉडक्शनअंडर स्टारकिड्सला लाँच करण्यासाठी जे चित्रपट बनवलेत त्या सगळयांमध्ये ‘नोटबुक’ नक्कीच उजवा आहे असं म्हणावं लागेल.

‘नोटबुक’चं संपूर्ण शूट काश्मिरमध्ये झालं आहे. या सिनेमातील लोकेशन्स या सिनेमाचे प्लस पाईंट आहेत. सिनेमाचं कॅमेरावर्क अप्रतिम झालं आहे. ‘मिशन काश्मिर’ या सिनेमातील ‘बुमरो बुमरो’ हे गाणं पुन्हा एकदा मस्त जमून आलं आहे. बाकी या सिनेमातील इतर गाणी विशेष लक्षात राहत नाही. सिनेमातील संवादांवरही थोडी मेहनत घेणं गरजेचं होतं. एकूणच काय तर थाळीतर स्वादिष्ट आहे पण एखादा पदार्थ यातून मिसिंग असं या सिनेमाच्या बाबतीत म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. काही त्रुटींकडे कानाडोळा केला तर प्रनुतनचा सहज अभिनय, काश्मिरचं सौंदर्य, अफलातून कॅमेरावर्कसाठी ‘नोटबुक’ एकदा बघायला हरकत नाही.

टीव्ही नाईन मराठीकडून या सिनेमाला तीन स्टार्स.