सैराट, पिस्तुल्या, फँड्री… आता नाळ २ ! चित्रपटांची एकाहून एक सरस नावं सुचतात तरी कशी ? नागराज मंजुळेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

| Updated on: Nov 04, 2023 | 3:17 PM

Nagraj Manjule | जनसामान्यांच्या मनाला भिडणाऱ्या कथा ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्यापर्यंतचा प्रवास... नागराज मंजुळेंनी फार मोठा टप्पा पार करत मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर ठेवलं आहे. पण ज्या चित्रपटांमुळे ते एवढे ओळखले जातात, त्यांची सरस नाव त्यांना सुचतात तरी कशी ? वाचा,ते काय म्हणाले.

सैराट, पिस्तुल्या, फँड्री... आता नाळ २ ! चित्रपटांची एकाहून एक सरस नावं सुचतात तरी कशी ? नागराज मंजुळेंनी सांगितला तो किस्सा
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 :फँड्री’ असो की आर्ची-परश्याचा ‘सैराट’, ‘नाळ‘ नाहीतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा ‘झुंड’, या चित्रपटांची नावं समोर आलं की डोळ्यासमोर एकच चेहरा येतो… तो म्हणजे नागराज मंजुळे यांचा. वेगळी कथा, वेगळे विषय, ती मोठ्या प़डद्यावर मांडण्याची अनोखी शैली हे नागराज मंजुळे यांचे ट्रेडमार्क आहेत. अवघ्या काही वर्षांतच त्यांनी त्यांचा असा एक ठसा उमटवला आहे.

आता लवकरच ‘नाळ’ सिनेमाचा दुसरा भाग ‘नाळ २’ हा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सगळीकडे ‘नाळ २’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणारा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत. त्याच निमित्ताने चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. टीव्ही9 मराठीच्या ऑफीसलाही या टीमने नुकतीच भेट देत मनसोक्त गप्पा मारल्या. सर्वांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तर देत धमालही केली.

याचदरम्यान दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अशा अनेक भूमिका लीलया पार पडणारे नागराज मंजुळे यांनाही अनेक प्रश्न विचारण्यात आले. फँड्री’, ‘पिस्तुल्या’ ‘सैराट’, ‘झुंड’, ‘नाळ’ असे त्यांचे एकाहून एक सरस चित्रपट गाजले, प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं आणि तगडी कमाईही केली. प्रेक्षकांना ही नाव ऐकूनच चित्रपटांबद्दल उत्सुकता असते. पण ती सुचतात तरी कशी ? नावं कशी ठरवता ? असा प्रश्नही नागराज मंजुळे यांना विचारण्यात आला.

वेगळेपण दाखवणारी नावं सुचतात तरी कशी ?

मी जो चित्रपट बनवतो, त्याचा आशय प्रेक्षकांपर्यत पोहोचावा पण चित्रपटांचं सगळं आकलन त्या नावातून होऊ नये, त्या नावातून उत्सुकताही वाढावी, असं नाव ठेवायची माझी भूमिका असते. त्यामुळेच चांगलं पण वेगळं नाव ठेवायचा माझा प्रयत्न असतो, असं नागराज म्हणाले.

खरंतर ‘नाळ’ या चित्रपटाचं नाव आमच्या एका मैत्रिणीने सुचवलं. आम्ही बराच विचार करत होतो, पण ते सापडतं नव्हतं. शेवटी तिने हे नाव सुचवलं आणि मग तेच फायनल झालं. पिस्तुल्या, फँड्री, सैराट, झुंड या चित्रपटांची नाव तर त्या-त्या प्रोसेसमध्ये सापडत गेल्याचे नागराज मंजुळे म्हणाले.

‘झुंड’च्या नावामागचा किस्सा माहीत आहे का ?

अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा नागराज मंजुळेचा ‘झुंड’ खूप गाजला. त्या चित्रपटाच्या नावाबद्दलही मंजुळे यांनी एक किस्सा सांगितला. मी जेव्हा ती फिल्मि लिहीत होतो, तेव्हा त्याचं नाव काय ठेवायचं हे मला सुचत नव्हतं. पण जेव्हा मी चित्रपटाचे डायलॉग लिहीत होतो तेव्हा ‘झुंड नही टीम कहियेगा’ हा बच्चन साहेबांच्या तोंडचा जो संवाद होता, तो लिहीताना मला अचानक क्लिक झालं की या चित्रपटाचं नाव ‘झुंड’ असू शकतं. आणि मग तेच नाव फायनल झालं, असं त्यांनी नमूद केलं.

कधी कधी काही चित्रपटांचं नाव आधीच सापडतं, जसं फँड्रीबद्दल झालं. त्या चित्रपटाचं नाव फँड्री असेल हे आधीच माझ्या डोक्यात फिक्स होतं, अस नागराज मंजुळे म्हणाले. ‘सैराट’चं नावही मला लिखाणाच्या प्रोसेसमध्ये सापडलं. कधी कुठलं नाव सुचेल असं सांगता येत नाही. पण ते आशयाशी निगडीत आणि उत्कंठावर्धक असेल याची मात्र मी काळज घेतो, असं त्यांनी आवर्जून नमूद केलं.