मुंबई | 11 जानेवारी 2024 : ‘कॉफी विथ करण’ या शोचा 8 वा सीझन सध्या सुरू आहे. अभिनेत्री झीनत अमान आणि नीतू कपूर यांनी नुकतीच या सीझनच्या नव्या भागात हजेरी लावली. त्यावेळी दोघींनीही त्यांच काम, बॉलिवूड याबद्दल गप्पा मारल्या. नीतू कपूर यांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत त्यांचे पती आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी नीतू कपूर यांनी अनेक खुलासे केले. गप्पा मारतानाच नीतू या अभिनेत्री जया बच्चन यांच्याबद्दलही बोलल्या.
जया बच्चन आणि पापाराझ्झी (फोटोग्राफर्स) यांचं (वाकडं) नातं सर्वांनाच माहीत आहे . संपूर्ण बच्चन कुटुंब फोटोंसाठी पोझ देत असलं तरी जया बच्चन यांना मात्र फोटो काढलेलं आवडत नाही. अनेकवेळा त्या फोटोग्राफर्सवर डाफरत असतात. फोटो काढायलाही त्या नकार देतात. त्यांची फोटोग्राफर्ससोबत होणारी नोकझोक,ही बरीच लोकप्रिय आहे. त्यावरून जया बच्चन अनेकवेळा ट्रोलही झाल्या आहेत. मात्र नीतू कपूर यांच्या मते, ‘ जया बच्चन तसं मुद्दाम करतात .’ कॉफी विथ करणमध्येच नीतू यांनी तसा खुलासा केला.
जया बच्चन यांची ती सवय…
अनेक सेलिब्रिटींनी आपले फोटो काढलेले आवडतात. अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही हसतमुखाने फोटो काढतात. पण जया बच्चन त्यांच्या अगदी उलट आहेत. त्यांना फोटो काढणं आवडत नाही. फोटोंसाठी फोटोग्राफर्सनी घेरणं, याची तर त्यांना अगदीच चीड आहे. अनेकवेळा त्या फोटोग्राफर्सना ओरडतात, त्यांना वाट्टेल तसं बोलतात.
पण नीतू कपूर यांच्या सांगण्यानुसार, जया बच्चन या मुद्दामच तसं वागतात. नीतू कपूर आणि जया बच्चन यांचा बाँड घट्ट आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्यांची मैत्री आहे. त्यामुळे नीतू यांनी जया बच्चन यांच्याबद्दलचं हे सीक्रेट सांगितलं. ‘ ते एकदा तसं (डाफरणं) झालं ना, आता त्या ( मुद्दाम) तसंच करतात’ असं नीतू कपूर म्हणाल्या. (जया) त्यांना ते फोटो वगैरे बिलकूल आवडत नाही, असंही नीतू यांनी स्पष्ट केलं.
जया बच्चन आणि फोटग्राफर्सची ‘मिली भगत’
त्यावर होस्ट करण जोहरनेही होकार दिला. जया बच्चन या खूप मनमिळाऊ आहेत. पण त्यांची एंट्री होताच अनेक जण त्यांना घाबरून जातात. ‘ त्या येतात आणि म्हणतात – बस हो गया ना ! ‘ फोटोग्राफर्सही त्यांच ओरडणं एन्जॉय करत असावेत, असं वक्तव्यही करण जोहरने केलं. त्यावर नीतू कपूर यांनीही दुजोरा दिला. ‘ जया बच्चनही ( ओरडणं) एन्जॉय करतात आणि फोटोग्राफर्सही! ‘ ती त्या दोघांची काही ‘मिली भगत’ (प्लान) असावी असंही मला वाटतं, असं नीतू कपूर म्हणाल्या.