मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना रानौत ही तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत असते. ती सतत कोणत्या ना कोणत्या मुद्यांवर तिचं परखड मत मांडत असते, मग तो विषय बॉलिवूडमधला असो किंवा राजकीय. ती तिचं म्हणणं सगळ्यांसमोर मांडल्याशिवाय काही रहात नाही. कंगना आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस नेपोटिज्मवर बोलली आहे, त्यावरून तिने करण जोहरसह बॉलिवूडमधील अनेकांवर निशाणाही साधला आहे. याचदरम्यान कंगानने आता अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिला खडेबोल सुनावले आहेत. ट्विंकलच्या एका वक्तव्यामुळे संतापलेल्या कंगनाने तिच्यावर टीका केली, आणि त्यामध्येही ती नेपोटिज्मचा मुद्दा घेऊन आली.
खरंतर ट्विंकल खन्नाने पुरूषांची तुलना पॉलीथीन बॅगशी केली होती, मात्र तिच्या या वक्तव्यामुळे कंगना चांगलीच संतापली आणि तिने त्यावर प्रतिक्रियाही दिली. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ट्विंकल खन्नाच्या जुन्या व्हिडीओची एक क्लिप शेअर करत, त्यावर पोस्ट लिहून तिच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाली कंगना ?
बॉलिवूडची क्वीन कंगनाने ट्विंकल खन्नावर टीका करत खडेबोल सुनावले. ‘ ही कशा प्रकारची प्रिव्हिलेज्ड ब्रॅट्स (विशेषाधिकारामुळे बिघडलेली मुलं) आहेत, जे त्यांच्या पुरूषांना पॉलीथीन बॅग म्हणतात ? ते काय कूल बनण्याचा प्रयत्न करत आहेत का ? ‘
सोन्याच्या ताटलीत करीअर मिळालं पण..
कंगनाने पुढे लिहीलं की – ‘या नेपो किड्सचा जन्म तोंडात चांदीचा चमचा घेऊन झाला, ( त्यांना) सोन्याच्या ताटलीत फिल्म करीअर सजवून मिळालं. पण त्यांना त्याला (करीअर) न्याय काही देता आला नाही’ अशा शब्दांत तिने पुन्हा एकदा नेपोटिज्मवरून निशाणा साधला. पुढे तिने लिहीलं – ‘ कमीतकमी त्यांना मातृत्वाच्या नि:स्वार्थतेमध्ये काही आनंद आणि समाधान मिळू शकतं, पण तोदेखील त्यांच्याबाबत एक शापच वाटतोय. त्यांना नेमकं काय व्हायचंय? भाजीपाला? याला स्त्रीवाद म्हणायचं का? ‘ अशा शब्दांत तिने ट्विंकल खन्नाच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. एकंदरच ती फार संतापलेली दिसली.
काय आहे प्रकरण ?
खरंतर हा ट्विंकल खन्नाचा एक जुना इंटरव्ह्यू आहे, त्यामध्ये तिला फेमिनिजमबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता.मोठं होत असताना आईने ( डिंपल कपाडियाने ) शिकवलं की महिलांना पुरूषांची गरज नसते. ‘आम्ही कधी फेमिनिझम किंवा समानता किंवा कशावरही चर्चा केली नाही. पण हे नक्की माहीत होतं की एका पुरूषाची गरज बिलकूल नव्हती.’ त्यादरम्यान बोलताना तिने पुरूषांची तुलना पॉलिथीन बॅगशी केली होती. त्याच इंटरव्ह्यूचा दाखला देत कंगनाने ट्विंकलवर टीकास्त्र सोडलं.