मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (actress Sonali Kulkarni) हिच्या कामातूनच तिची वेगळी ओळख निर्माण होते. विविध भूमिका केलेली सोनाली ही चोखंदळ पण तितकीच गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने तिच्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. मात्र सध्या सोनाली एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एका कार्यक्रमात भारतातील मुलींवर , त्यांच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर केलेल्या विधानामुळे (comment) तिच्यावर टीका होत आहे. सोशल मीडिया, ट्विटर (social media) येथे तर अनेक लोक खूपच तिच्यावर भडकले आहेत.
या व्हिडीओमध्ये सोनालीने भारतीय मुलींना आळशी म्हटलं होतं. मुलींना चांगले पैसे कमावणारा मुलगा बॉयफ्रेंड किंवा पती म्हणून हवा असतो. पण त्या स्वतः मात्र पैसे कमावण्यास उत्सुक नसतात, अशा आशयाचे वक्तव्य तिने एका कार्यक्रमादरम्यान केले होते. तिच्या या वक्तव्यानंतर काहींनी तिचं समर्थन केलंय, पण बहुसंख्य लोकांना तिचं म्हणणं पटलेलं नसून तिचं मत चुकीचं असल्याचं सांगत अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेदनेही तिच्या वक्तव्याची दखल घेत तिचं म्हणणं अतिशय असंवेदनशील असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
‘ तू जे काही म्हणालीस ते किती असंवेदनशील होतं. आधुनिक काळातील महिला त्यांची नोकरी व घर हे दोन्ही समर्थपणे सांभाळतात. त्यांना तू आळशी कशी म्हणू शकतेस म्हणतेस? चांगले पैसे कमावणारा नवरा हवा, अशी मुलींची इच्छा असेल तर त्यात गैर काय आहे?’ असा प्रश्न विचारत उर्फीने तिला सुनावलं आहे.
How insensitive , whatever you said !
You’re calling modern day women lazy when they are handling their work as well as household chores together ?
What’s wrong in wanting a husband whose earning good ? Men for centuries only saw women as child vending machine and yes the main… https://t.co/g1rQGyuSDg— Uorfi (@uorfi_) March 17, 2023
सोनाली कुलकर्णीच्या या वक्तव्याचा नेटकऱ्यांनीही खरपूस समाचार घेतला आहे. ‘भारतातील स्त्रिया आळशी आहेत, असं प्रिव्हिलेज्ड, उच्चवर्णीय महिलाच म्हणू शकते. या देशातील महिलांकडे पाहा. या देशात महिला कोणत्या विदारक परिस्थितीतून जातात याचा सरकारी डेटा तुम्ही वाचायला हवा,’ असं एका युजरने म्हटलं आहे.
तर दुसऱ्या एका युजरनेही सोनालीचं म्हणणं खोडून काढलं आहे. ‘ नोकरी करणाऱ्या स्त्रिया जर पती व कुटुंबाप्रती जबाबदारी पार पाडत नसतील तर त्या आळशी नाहीत. पण गृहिणी आळशी असतात, असं यांचं म्हणणं आहे. एकही पैसेा न मिळता, पगारी सुट्ट्या नसतानाही जबाबदाऱ्या पार पाडणे हे गृहिणींचे सर्वात कठीण काम आहे,’ असही त्या युजरने सोनाली कुलकर्णी हिला सुनावलं आहे.
या देशातील बहुसंख्य महिला त्यांचं कुटुंब सांभाळण्यासाठी प्रचंड मेहनत करतात, त्यामुळे सोनालीने असं सरसकट सगळ्याच महिला व मुलींना आळशी म्हणणं अत्यंत चुकीचं आहे, अशा आशयाच्या कमेंट्स करत नेटीझन्सनी सोनालीचं म्हणणं खोडून काढलं आहे.
काय म्हणाली होती सोनाली ?
लग्नासाठी मुलगा शोधताना मुलींच्या अपेक्षा किती जास्त व अवाजवी असतात, याबद्दल सोनाली एका कार्यक्रमात बोलत होती. ‘ भारतात खूप साऱ्या मुली आळशी आहेत. त्यांना असा पती किंवा बॉयफ्रेंड हवा असतो, ज्याच्याकडे चांगली नोकरी, घर असेल, पगार वाढण्याची खात्री असेल. पण त्या मुलीत इतकी हिंमत नसते की ती एखाद्या मुलाला म्हणू शकेल की तू माझ्याशी लग्न केल्यावर मी काय करेन.’
याबाबतीत सोनालीने तिच्या एका मैत्रिणीची किस्सा सांगितला. तिला 50 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेला मुलगा नकोच, त्याच्याकडे कारही हवी. आणि तो सासू-सासऱ्यांशिवाय एकटा रहात असेल तर उत्तम, अशा तिच्या अपेक्षा होत्या, असं सोनालीने नमूद केलं. तिने तिच्या मैत्रिणीला विचारलं की तू काय मॉलमध्ये आली आहेस का? तुला मुलगा हवाय की ऑफर हवी आहे. हे खरंच खूप अपमानास्पद आहे, असं मत सोनालीने मांडलं.
मुलं 18 वर्षांची झाल्यावर त्यांना पैसे कमावण्याचा दबाव असतो. कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी येते. हे पाहून मला माझ्या या भावांसाठी रडायला येतं. दुसरीकडे मुली मात्र 25-27 वर्षांच्या होईपर्यंत फक्त विचारच करत असतात. त्यांना हनिमूनही परदेशात हवा असतो. लग्न, प्री-वेडिंग शूट, या सगळ्याचा अवाढव्य खर्चही मुलाने करायचा असा त्यांचा आग्रह असतो. असं का असा प्रश्न विचारत सोनालीने मुलींना ऐशो-आराम हवा असेल तर त्यांनीही पैसे कमवावेत असा मुद्दा मांडला. पुरुषांना एकदा सांगून पहा 6 महिने तुम्हाला बिल भरण्यापासून सुट्टी, त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू येतं ते पहा, असंही सोनाली म्हणाली.
सगळ्या मुली, महिला अशा असतात असं नाही. पण हे अग्रेशन आणि सतत मागण्या करणारा स्वभाव असलेल्या मुली झपाट्याने वाढत आहेत, असं मतही तिने व्यक्त केलं. तिच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू असून अनेक जण तिच्याशी सहमत आहेत पण काही लोकांना तिचं म्हणणं पटलेलं नाही.