मुंबई : कोरोना आला आणि सगळं जग ठप्प झालं. अशात चित्रपट, मालिकांचं चित्रीकरणही ठप्प झालं. त्यामुळे जुने एपिसोड पुन्हा पुन्हा पाहावे लागले होते. आता अनलॉकमध्ये चित्रीकरण सुरू झाल्यानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. यात आणखी आनंदाची बातमी म्हणजे नव्या वर्षात काही नव्या मालिका तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
१. पुष्कर श्रोत्री उलगडणार सासू सुनेचं गमतीशीर नातं, ‘सून सासू सून’प्रेक्षकांच्या भेटीला!
‘मराठी परंपरा, मराठी प्रवाह’ हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीनं नव्या नव्या संकल्पनेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नवनव्या कार्यक्रमांच्या माध्यमांतून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणारी स्टार प्रवाह वाहिनी नव्या वर्षात असाच एक नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचं नाव आहे ‘सून सासू सून’. सासु सुनेचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच काहीसं असतं. सासु सुनेचं हेच गमतीशीर नातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात कुठेही घरातील कलह, कुरबुरी आणि मतभेद नसतील तर, फक्त आणि फक्त सुसंवाद असणार आहे. सासू- सुनांमध्ये हा सुसंवाद घडवून आणण्याचं काम अभिनेता पुष्कार श्रोत्री करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलेल्या कुटुंबाला भेटण्याचं काम पुष्कर या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहे.
सासू आणि सून हे नातं अनोखं आहे. कुटुंब आणि घर जपणाऱ्या या दोघी कधी मैत्रीणी तर कधी मायलेकी असतात. कधी कुरबुर असते पण ती क्षणिक. अश्या हळुवार नाती जपणाऱ्या दोघींना भेटुन समजून थोडा छान वेळ घालवता येईल, असा हा कार्यक्रम असणार आहे.
२.‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
आपलं सुखाचं हक्काचं माहेर सोडून मुलगी एका वेगळ्याच कुटुंबात प्रवेश करते. असं घर जे इथून पुढे तिचं होणार असतं. या प्रवासात तिला पतीची साथ असली, तरी एका जिवाभावाच्या मैत्रिणीची उणीव तिला कायमच भासत असते. अशावेळी सासूच जर तिची सखी झाली, तर नात्यांचा गोडवा अधिकच वाढतो. आणि घराचं गोकुळ होतं. अशाच एका गोड नात्याची कथा सांगणारी मालिका झी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
या मालिकेचे नाव आहे, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’. शकु आणि स्वीटू या दोघी नात्यानं सासू सूना आहेत. पण, मनानं मैत्रीच्या धाग्यानं घट्ट बांधल्या गेल्या आहेत. मिश्किल सासू आणि खट्याळ सून मिळून घरात वेगळीच गंमत करतात. आणि या गंमतीचच नाव असणार आहे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’!
या मालिकेची पटकथा सुखदा आयरे, कथा विस्तार समीर काळभोर आणि संवाद किरण कुलकर्णी, पल्लवी करकेरा यांचे आहेत. मालिकेचे दिगदर्शक अजय मयेकर करत आहेत. शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शाल्व किंजवडेकर नायकाच्या भूमिकेत आणि अन्विता फलटणकर नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत.