Nick Priyanka Love Story : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि गायक निक जोनास (Nick Jonas) यांचे प्रेम चाहत्यांना स्पष्टपणे दिसून येते. कोणताही टप्पा असो, देसी गर्ल निक जोनासचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. आता निक जोनासही प्रियांकावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. अलीकडेच, निक त्याचे भाऊ जो आणि केविनसोबत एका चॅट शोमध्ये दिसला, जिथे त्याने त्याची पत्नी प्रियांका चोप्राबद्दल उघडपणे भावना व्यक्त केल्या. निकने सांगितले की, प्रियंका आयुष्यात येण्यापूर्वी त्याला काहीच आठवत नाही.
खरंतर एका चाहत्याने निक जोनासला विचारले की, प्रियांकाच्या आधी त्याने असा डायरेक्ट मेसेज कुणाला पाठवला होता आणि प्रियांकाला पहिल्यांदा कोणता मेसेज पाठवला होता. निकने त्यावर सुंदर उत्तर दिले आणि सांगितले की, ‘प्रियांका आयुष्यात येण्यापूर्वी सर्व काही दूरच्या आठवणीसारखे वाटते, जे आता लक्षात नाही’.
जेव्हा शोच्या होस्टने निकला विचारले की तू प्रियांकाला पहिला मेसेज कोणता पाठवला होता, तेव्हा त्याने त्याचा फोन चेक केला आणि मला बघू दे असे सांगितले. निकने त्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतला आणि प्रियांकाला पाठवलेला पहिला मेसेज वाचून दाखवला. त्या मेसेजमध्ये निक प्रियांकाला म्हणाला, ‘हाय, मला माहित आहे की आपल्यात बर्याच गोष्टी सामायिक आहेत, मित्रही समान आहेत, मला वाटते की आपण भेटले पाहिजे.’ त्यावर प्रियांकाने दिलेले हो असे उत्तर ऐकून निक खूपच आश्चर्यचकित झाला होता.
प्रियांकाच्या आधी मी लोकांना डीएम, डायरेक्ट मेसेज केले होते, पण आता प्रियंका माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची आहे, असेही निक म्हणाला. निक जोनास आणि प्रियांका चोप्राची प्रेमकथा स्वप्नासारखी आहे. पूर्णपणे भिन्न पार्श्वभूमीतून येऊनही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रियांका आणि निकचे लग्न 2018 मध्ये झाले होते. दोघांना एक गोड मुलगी आहे. अनेकदा निक-प्रियांका क्वॉलिटी टाइम एकत्र घालवताना दिसतात.