टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर हिने गेल्या वर्षी मार्च महिन्यात केनियामधील बिझनेसमन निखिल पटेल याच्याशी मुंबईत विधिवत लग्न केलं. धूमधडाक्यात झालेल्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्या दोघांच्या लग्नानंतर दलजीत आणि तिचा मुलगा जेडन हे दोघेही केनियात स्थायिक झाले. मात्र त्यानंतर वर्षभराच्या आतच दिलजित आणि निखिल यांच्या नात्यात बेबनाव झाला आणि लग्नानंतर अवघ्या 10 महिन्यांतच, जानेवारी 2024 मध्ये दलजीत ही तिच्या मुलासोबत भारतात परत आली. मात्र येथे आल्यावर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून, तसेच अनेक स्टेटमेंट्स करत निखिलवर अनेक आरोप केले, त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप तिने केला. गेल्या काही महिन्यांत त्यांच्यातील हा वाद टोकाला गेलेला असून काही महिन्यांपूर्वी निखिल पटेलने दलजीतच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं.
मात्र त्यानंतरही दलजीतच्या आरोपांच्या फैरी सुरूच असून ऑगस्ट महिन्यात तिने निखिलवर फसवणुकीचा आरोप करत एफआयआर दाखल केला. तसेच सोशल मीडियातून अद्यापही ती अनेक आरोप करतच आहे. नुकताच निखिल त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत मुंबईत आला होता. यावेळी पापाराझींसमोर दोघांनी फोटोसाठी पोझसुद्धा दिले होते. यावरून दलजीतनेही सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं होतं.
मात्र आता निखिल पटेल याने मौन सोडत दलजीतच्या आरोपांवर स्पष्ट उत्तर दिली आहेत. तिच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना निखिल पटेल याने एक ऑफिशिअल स्टेटमेंटही जाहीर केलं आहे.
निखिल पटेलचं म्हणणं काय ?
मीडिया हाऊसला त्याने एक निवेदन जारी केलं असून याप्रकरणाबाबत निखिलने खुलासा केला आहे. ‘दलजीत आणि मी 2022 साली दुबईत भेटलो. त्यानंतर मार्च 2023 मध्ये आम्ही मुंबईत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं. लग्नानंतर आम्ही नैरोबी (केनिया) येथे शिफ्ट झालो. जानेवारी 2024 पर्यंत आम्ही केनियामध्ये एका कुटुंबासारखे राहिले, मात्र त्यानंतर दलजीत तिच्या मुलासह भारतात परतली.’
दलजीत कौरवर लावले अनेक आरोप
पुढे तो म्हणाला , ‘ दलजीतला केनियामध्ये शिफ्ट व्हायचं होतं आणि तिला माझ्यासह व माझ्या मुलींसह नवं आयुष्य सुरू करायचं होतं. आमचं लग्न झालं तेव्हा माझा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झालेला नव्हता हे तिला माहीत होतं. माझ्या लीगल काऊन्सिलने दलजीतच्या पालकांना एक पत्र पाठवलं होतं, त्यामध्ये ही गोष्टनमूद करण्यात आली होती. त्यानंतरही ते या लग्नासाठी तयार झाले. त्यामुळेच आमचं लग्न गुरुद्वारा किंवा मंदिरात नव्हे तर एका बँक्वेट हॉल मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार झालं. या विवाहाला सांस्कृतिक मान्यता असली तरी ते कायदेशीररित्या बंधनकारक नाही. त्या सोहळ्याचा हेतू हाच होता की दलजीतला माझ्यासोबत शिफ्ट होता यावं. यावर्षी जानेवारी महिपर्यंत माझा घटस्फोट अधिकृत झाला नव्हता. मात्र तोपर्यंत दलजीत केनिया सोडून भारतात निघून गेली होती. ‘
‘मी एक विवाहीत माणूस आहे याची दलजीतला पूर्णपणे कल्पना होती आणि ती विवाहीत माणसाशी नातं जोडत्ये हेही ती जाणून होती. माझं आधीच लग्न झालंय हे दलजीतला माहीत होतं आणि आता ती माझ्यावर चीटरचा टॅग लावत हे. माझे विवाहबाह्य संबंध सुरू असल्याचा दावाही तिने केलाय’, असं निखिल म्हणाला. 2 ऑगस्टला माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच दलजीतने माझ्याविरोधात FIR दाखल केली. तिने तिच्या माजी पतीविरोधात जे डावपेच वापरले तेच ती माझ्या विरोधातही करत आहे. तिने FIR मध्ये जे दावे केले आहेत, ते चुकीचं असल्याचंही निखिलने नमूद केलं.
अनेक मुद्यांवर स्पष्ट उत्तर दिल्यानंतर निखिलने दलजीतला आणि तिचा मुलगा जेडन याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.