बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचा यशापर्यंतचा प्रवास हा अजिबात सोपा नव्हता. फार संघर्षाने या अभिनेत्री त्या यशापर्यंत पोहोचल्या आणि आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं.
अशीच एक अभिनेत्री जिने अनेक वाईट दिवसांमधून आपले चांगले दिवस पाहिले. एवढच नाही तर ती एक सिंगल मदर म्हणूनही तिचा प्रवास सोपा नव्हता. अन् आज तिच अभिनेत्री करोडोंची मालकीण आहे.
ही अभिनेत्री आहे नीना गुप्ता. नीना गुप्ता यांना कोणत्याही ओळखीच आवश्यकता नाही. त्यांचं काम आणि त्यांचा बोल्ड-बिनधास्त स्वभाव हा सर्वांच्याच आवडीचा आहे. चित्रपट आणि बेव सीरिजमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नीना यांचे बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळं अस्तित्व आहे. त्यांचा हा इथपर्यंत प्रवास अजिबात सोपा नव्हता.
निना गुप्तांचा संघर्ष
निना गुप्ता या सिंगल मदर आहेत. त्यासाठीचा त्यांचा संघर्ष हा वेगळा होताच पण त्यांना सर्वात जास्त संघर्ष करावा लागला ते घरासाठी. कारण एक वेळ अशी होती की त्यांना राहायला घर नव्हतं. त्यात बाळ लहान असल्याने त्याला घेऊन राहण्याचा प्रश्न होताच. हाच अनुभव त्यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे.
नीना गुप्ता यांनी 1980 च्या दशकात मुंबईत घर शोधण्याच्या आव्हानात्मक प्रवासाबद्दल सांगितलं. नीना यांनी आधीपासून घर भाड्याने घेणं टाळलं. एकदा नीना यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. नीना यांनी सांगितलं की त्यांनी एका बिल्डरच्या नवीन प्रकल्पात थ्री बीएचके फ्लॅट बूक केला होता.
त्यांनी राहतं घर विकून या फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली होती. या काळात अभिनेत्रीची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. फ्लॅटसाठी पैसे भरल्यानंतर जवळ पैसे नव्हते. त्यामुळे त्या काका-काकूंबरोबर राहायला गेल्या होत्या.
काकूंनी मध्यरात्री घराबाहेर काढलं
नीना म्हणाल्या, “मी माझ्या काकूच्या घरी शिफ्ट झाले. आधीही मी त्यांच्याबरोबर राहत होते. माझं घर असतानाही मी त्यांच्याकडेच जास्त वेळ घालवायचे आणि फक्त झोपण्यासाठी माझ्या घरी जायचे. मसाबा लहान असल्यापासून माझी काकू मला मदत करायची, पण एकदा अचानक तिने मला मध्यरात्री घराबाहेर काढलं.
माझ्याकडे पैसे नव्हते आणि राहायला जागा नव्हती. त्यावेळी मला बाळाला घेऊन कुठे जावं ते समजत नव्हतं.” यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची तडजोड केल्याचं सांगितलं.
20 वर्षांपासून बंद असलेला फ्लॅट दिला अन्
नीना यांना त्यांच्या काकांनी नंतर जुहू येथे एक रिकामा फ्लॅट दिला. तो 20 वर्षांपासून बंद होता. धुळीने माखलेलं घर त्यांनी साफ केलं आणि नंतर काही काळातच त्यांना ते सोडायला सांगितलं. नीना म्हणाल्या, “मी त्यांच्याबरोबर शिफ्ट होण्याआधीच दोघांनाही सांगितलं होतं की माझ्याकडे आता घर नाही, त्यामुळे मी तुमच्याकडे राहिलेलं तुम्हाला चालणार आहे का? तेव्हा ते हो म्हणाले.
नंतर मला घरातून बाहेर काढलं. त्यानंतर काकांना खूप वाईट वाटलं म्हणून त्यांनी मला त्यांच्या सासू-सासऱ्यांच्या फ्लॅटमध्ये जुहूला पाठवलं. ते घर 20 वर्षांपासून बंद होतं. लहान मुलगी असूनही मी ते घर स्वच्छ केलं, पण लवकरच त्यांनी मला ते सोडायला सांगितलं.” अत्यंत हालाखिची परिस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
घरासाठी करावा लागला संघर्ष
राहायला जागा नसल्याने नीना यांनी त्या बिल्डरशी संपर्क साधला, त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. मग बिल्डरने सगळे पैसे परत केले. त्या पैशांमधून नीना यांनी आराम नगरमध्ये घर खरेदी केलं आणि मग त्या मुलीसह तिथे राहायला गेल्या होत्या.
नीना गुप्ता 1980 च्या दशकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिल्या होत्या. त्या वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्सबरोबर रिलेशनशिपमध्ये होत्या.1989 मध्ये त्यांनी मुलगी मसाबाला लग्न न करताच जन्म दिला आणि तिचा सांभाळ केला. नीना यांनी अनेक चित्रपटांमध्ये आणि वेबसीरिजमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली. आज त्या करोडोंच्या मालकीण आहेत.