मुंबई | 17 मार्च 2024 : आपण एखादं स्वप्न पाहातो, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असतो. पण बरेचदा मेहनत घेऊनही हवं ते यश मिळत नाही. कधी-कधी कितीही पाठलाग केला तरी ती स्वप्न पूर्ण होत नाहीत. मग आपण खचून जातो. आपण काहीही करू शकत नाही, असं वाटू लागतं. मात्र अशावेळी नवी संधी खुणावत असते. ती संधी ओळखायची अन् त्याचं सोनं करायचं असंच काहीसं उर्मिला निंबाळकरच्या जर्नीकडे पाहिलं की वाटतं. अभिनेत्री असणाऱ्या उर्मिला निंबाळकरने यूट्यूबर होण्याचं ठरवलं तो काळ तिच्यासाठी प्रचंड खडतर होता. आपण शून्य आहोत. आपल्याला काहीही जमत नाही, असं उर्मिलाला वाटत होतं. पण त्यातून तिने नवा मार्ग स्विकारला अन् आता उर्मिला निंबाळकर ही देशातल्या प्रसिद्ध युट्युबरपैकी एक आहे.
उर्मिला एका मालिकेत काम करत होती. अचानक एक दिवशी जेव्हा ती सेटवर गेली होती. तेव्हा तिच्या कुणी नीट वागेना. तिचा मेकअप कुणी करत नव्हतं. तिला तुटक वागणूक दिली गेली आणि तिला सांगण्यात आलं की तिला मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. यावेळी कुणाही व्यक्तीला वाटेल तशाच उर्मिलाच्याही मनात भावना आल्या. तिच्या पायाखालची जमीन सरकली. आता सगळं संपलं असं तिला वाटत होतं.
उर्मिला वारंवार आजारी पडते. तिच्यामुळे सेटवरच्या लोकांना त्रास होतो. बरेच आरोप उर्मिलावर करण्यात आले. एकढंच नव्हे तर ती स्वत: हून मालिका सोडत आहे, असं लिहून घेण्यात आलं. यानंतर उर्मिलाला प्रचंड मानसिक त्रास झाला. तिने सेटवरून लिपस्टिक चोरी केल्याचा आरोपही करण्यात आला. तिची बॅग चेक केली तर त्यात ते सापडलं नाही. ती डिप्रेशनमध्ये गेली.
एके दिवशी तिला वाटलं की यूट्यूब चॅनेल सुरू करावं आणि तिने उर्मिला निंबाळकर या नावाने यूट्यूब चॅनेल सुरु केलं. आधी या यूट्यूब चॅनेलला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण आता तिच्या या यूट्यूब चॅनेलने एक मिलियन सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. अभिनेत्री ते प्रसिद्ध यूट्यूबर हा तिचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.