मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडितची मुख्य भूमिका असलेली अनुराधा ही वेब सिरीजची मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चा होत आहे. या वेब सिरीजमध्ये हाताळण्यात आलेला विषय तसेच डायलॉगमुळे प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र सध्या या वेब सिरीजच्या जाहिरातीवरच आक्षेप नोंदवण्यात आलाय. पुण्यातील अॅड.जयश्नी पालवे यांनी महिला आयोगाकडे वेब सिरीजच्या जाहिरातीबाबत ट्विटद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने दिग्दर्शक संजय जाधव यांच्याकडून खुलासा मागवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात अनुराधा या वेब सिरीजची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आलीय. यासाठी पुण्यात ठिकठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. यामध्ये महिलेच्या हातात सिगारेट देऊन ओंगळवाणे प्रदर्शन करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत अॅड. जयश्नी पालवे यांनी राज्य महिला आयोगाला थेट ट्टीट कर तक्रार केली आहे. याच तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने अनुराधा वेब सिरीजच्या जाहिरातीबाबत खुलासा मागितला आहे. तसं पत्र आयोगाने वेब सिरीजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना पाठवण्यात आलंय.
दरम्यान, महिला आयोगाने खुलासा मागवल्यानंतर आता दिग्दर्शक संजय जाधव काय भूमिका घेणार तसेच पुण्यातील जाहिरातबाजीवर कोणते स्पष्टीकरण देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याआधीदेखील अनुराधा ही वेब सीरीज चर्चेचा विषय ठरली होती. वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी ‘माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक!’ असे म्हणत काही अभिनेत्र्यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केले होते. हे व्हिडीओ नंतर व्हायरल झाले होते. तसेच अभिनेत्र्या लिपस्टिक बॅन का म्हणत आहेत असे विचारले जात होते.
संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ ही 7 भागांची वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
इतर बातम्या :