मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : आठवड्याभरापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिच्या मृत्यूच्या वृत्ताने एकच खळबळ माजली होती. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये पूनमचे सर्व्हिकल कॅन्सरमुळे निधन झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या बातमीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. तरूण वयात तिचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली. बॉलिवूड कलाकार ते सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांनी तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करत तिला श्रद्धांजलीदेखील वाहिली. तिचा मृत्यू कुठे, कसा, कधी झाला याबद्दल बरीच चर्चा रंगली. सोशल मीडियावर देखील ती ट्रेंडिंगमध्ये होती. मात्र या बातमीनंतर अवघ्या 24 तासांनी स्वत: पूनमनेच एक व्हिडीओ शेअर केला, ती त्यामध्ये बोलताना दिसली. आपला मृत्यू झाला नसून आपण जिवंत असल्याचे तिने या व्हिडीओद्वारे जाहीर केले.
पूनमचा व्हिडीओ पाहून लोक हैराण
मात्र तिचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराणच झाले. गर्भाशयाच्या कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपण हे केल्याचे पूनमने व्हिडीओद्वारे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर या व्हिडीओद्वारे पूनम पांडे हिने लोकांची माफी देखील मागितली. मात्र तिचा हा स्टंट लोकांना काही फारसा आवडला नाही, पटला तर बिलकूलच नाही. तिच्यावर जोरदार टीका झाली, सोशल मीडियावरही तिला ट्रोल करण्यात आले. स्वत:च्या मृत्यूचा बनाव पूनम पांडेला भलताच महागात पडला. आणि आता तिच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत. पूनमने तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवल्याबद्दल, एका इन्फ्लुएन्सरने पूनमविरोधात पाऊल उचलले आहे. रिॲलिटी शो फेम फैजान अन्सारी याने कानपूर पोलीस आयुक्तांना अर्ज दिला आहे. अर्जात पूनम पांडेला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांकडे केली कारवाईची मागणी
या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. ‘डेटिंग बाजी’ या रिॲलिटी शोमधून प्रसिद्ध झालेल्या फेम फैजान अन्सारीने पूनम पांडे आणि पती सॅम यांच्याविरोधात कानपूर पोलिसांना अर्ज दिला आहे. खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी पूनमला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्याच्या पूनम पांडेच्या या स्टेपला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी चुकीचे म्हटले. तिच्यावर खूप टीकाही झाली.
खोट बोलल्यामुळे भडकला फैजान
पूनमविरोधात तक्रार दाखल केलेल्या फैजानने सांगितले की, पूनमच्या या खोट्या कृतीमुळे तो खूप व्यथित झाला आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पूनमने हे केले आहे. पूनमने पश्चात्ताप करून चिल्ड्रन कॅन्सर हॉस्पिटलला 2 कोटी रुपये दान करावे, अन्यथा पूनमवर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करू, असेही फैजानने म्हटले आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात पूनमच्या बाजूने अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
या कंपनीने सोडली पूनमची साथ
या बनावाचा पूनमला मोठा फटका बसला आहे. ट्रोलिंग , टीका तर होतेच आहे पण अमेरिकेतील फार्मास्यूटिकल कंपनी मर्कने भारतीय उपकंपनी असलेल्या एमएसडीनेहू पूनमला झटका दिला आहे. तिचा मोठा मोठा करार रद्द करण्यात आला. क्रिएटिव्ह मार्केटिंग सोल्युशन्स एजन्सीसोबतचा तिचा करार संपवला आहे. विशेष गोष्ट म्हणजे, ही तीच एजन्सी आहे जी पूनम पांडेच्या या वादग्रस्त पब्लिसिटी स्टंटमध्ये सामील होती.