मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री पूनम पांडेच्या अकस्मात निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. पूनमच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही बातमी शेअर करण्यात आली. त्यामुळे इंटस्ट्रीमध्ये खळबळ माजली आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी पूनमने अखेरचा श्वास घेतला. ती सर्व्हिकल कॅन्सरशी झगडत होती. ‘ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. पूनमचं निधन सर्व्हाइकल (गर्भाशयाच्या) कॅन्सरने झालं आहे’, असं तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिच्या अकस्मात एग्झिटमुळ् अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिला श्रद्धांजली वाहिली.
तसं पहायला गेलं तर पूनम पांडेचं आयुष्य हे एका खुल्या पुस्तकासारखं होतं, तिच्या आयुष्याविषयी सगळ्यांनाच माहिती आहे. पण तिच्या आयुष्यातील काही रहस्य अशीदेखील आहेत ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या पूनम पांडेसाठी मनोरंजन क्षेत्रात येण्याचा निर्णय खूप कठीण होता. तिचा जन्म दिल्लीत झाला. पूनमने सहाव्या इयत्तेपासून कमाई करायला सुरुवात केली. 13 वर्षांचा असताना तिने टेलरिंगचं कामही सुरू केलं. एवढंच नव्हे तर ती बराच काळ मुलांच्या शिकवण्याही घेत होती.
आईन पहिलं शूट पाहिलं तेव्हा..
फॅशन चित्रपट पाहिल्यानंतर पूनमने ठरवलं की तिला मॉडेलिंग करायचं आहे. त्यासाठी तिने मेहनतही सुरू केली. पण जेव्हा तिच्या आईने तिचं पहिलं बिकिनी शूट पाहिले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती प्रचंड संतापली होती. हा फोटो ज्याने कोणी काढला, त्याला माझ्या चपलेने हाणेन, असं तिची आई रागात म्हणाली होती. मात्र त्यानंतर परिस्तिती बदलली. नंतर तिच्या आईने तिची बरीच साथ दिली आणि तिला पूनमबद्दल गर्वही वाटत होता.
बेताल वक्तव्यं आणि वाद
पूनम पांडे आणि वाद हे जुनं समीकरण आहे. तिची वर्ल्डकप कॉन्ट्रोव्हर्सी तर सर्वांनाच माहीत आहे. 2011 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान तिने एक वक्तव्य केलं. ‘भारताने ( वर्ल्डकपचा) अंतिम सामना जिंकला, तर मी स्ट्रिपिंग करेन, असं तिने जाहीर केलं होतं.’ तिच्या या वक्तव्याची खूप चर्चा झाली, त्यावरून बराच गदारोळही माजला होता, लोकांनी सोशल मीडियावर तिला बरंच ट्रोलही केलं होतं. पण ही कॉन्ट्रोव्हर्सी प्लान करण्यात आली होती, असं पूनमने नंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं.
खरंतर बरंच काम करूनही तिला प्रसिद्धी आणि सेलिब्रिटी स्टेटस मिळत नव्हतं, तेव्हा तिच्या एका फ्रेंडने तिला सल्ला दिला होता की तू असं काही (खळबळजनक वक्तव्य) करू शकतेस का. तेव्हा पूनमने हो म्हटलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची बातमी प्रत्येक न्यूजपेपरवर झळकत होती.
घरातून बाहेर काढलं
पण तिच्या आई-वडिलांनी जेव्हा पेपरमध्ये ही बातमी वाचली तेव्हा त्यांच्या रागाला पारावार उरला नाही. पूनमला बराच ओरडा बसला आणि तिला घराबाहेरही हाकलण्यात आलं. पण तिने, हसतमुखाने आई वडिलांची समजूत काढली होती. मला आयुष्यात काहीतरी मिळवायचे आहे हे आईलाही माहीत आहे, त्यामुळे ती मला साथ देते, असं तेव्हा पूनमने नमूद केलं होतं.