मुंबई : 2 ऑक्टोबर 2023 | अभिनेता विवेक ओबेरॉयसह आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपी या मनोरंजन कंपनीच्या अंतर्गत आणखी तिघेजण ‘गुंसे’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती करणार होते. यासाठी 31 जानेवारी 2017 रोजी त्यांच्यात करार झाला होता. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी काम करणार होता. त्यासाठी मानधन म्हणून 51 लाख रुपयांची आगाऊ रक्कम दिली गेली. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार होते. तसेच एका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीसोबत भागीदारीसाठी बोलणी झाली होती.
‘गुंसे’ चित्रपटाचे नाव बदलून नंतर ते ‘हड्डी’ असे ठेवण्यात आले. नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ या दरम्यान विवेक ओबेरॉय आणि त्याचे तीन भागीदार संजय शाह, नंदिता शाह आणि राधिका नंदा यांच्यात वाद झाला. हा वाद कंपनीच्या पैशाचा वैयक्तिक वापर करण्यावरून वाद झाला होता.
विवेक ओबेरॉयच्या तिन्ही भागीदारांनी त्याला न कळवता चित्रपट शूट केला. गुंसे चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या व्यक्तिरेखेचे नाव हड्डी होते. त्यामुळे हे नाव बदलून हड्डी नाव ठेवण्यात आले. त्यासाठी आणखी एक नवीन कंपनी स्थापन करण्यात आली. आनंदिता एंटरटेनमेंट स्टुडिओ बॅनरखाली 7 सप्टेंबर रोजी ‘हड्डी’ चित्रपट ओटीपीवर प्रदर्शित झाला.
विवेक ओबेरॉय यांनी 19 जुलै रोजी कंपनी आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीचे भागीदार संजय शाह, नंदिता शाह आणि राधिका नंदा यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. चित्रपट निर्मितीबाबत आपली फसवणूक केल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले.
याच प्रकरणावरून एमआयडीसी पोलिसांनी ‘हड्डी’ चित्रपटाचा कथित निर्माता संजय शाह याला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक होण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्माता संजय शहा याला पोलिसांनी कोर्टातून रिमांडवर घेऊन चौकशी सुरु केली आहे. परिमंडळ 10 चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी या निर्मात्याच्या अटकेची माहिती दिली. वांद्रे हॉलिडे कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.