मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : 2021 सालच्या अखेरीस साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धमाका केला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या अपोझिट रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) होती. तिची श्रीवल्लीची भूमिका लोकांना प्रचंड आवडली होती. गेल्या अनेक काळापासून लोकं पुष्पा 2 बद्दल चर्चा करत असून चाहते त्या चित्रपटाची वाट बघत आहेत. याचदरम्यान रश्मिकाला एक दुसरा, मोठा चित्रपट मिळाल्याची चर्चा आहे.
रश्मिका मंदाना हिला साऊथचा सुपरस्टार धनुषसोबत चित्रपट मिळाला आहे, अशी चर्चा आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही, परंतु सध्या या चित्रपटाचे नाव D51 असे आहे. शेखर कमुल्ला या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये झळकणार असल्याचे समजते. रश्मिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भातील एक व्हिडिओही शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये रश्मिका नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत असून चाहत्यांसाठी आपल्याकडे एक सरप्राईज असल्याचे ती सांगत आहे. यामध्ये तिने D51 चे पोस्टर असलेली एक फोटो फ्रेम दाखवली. त्यानंतर ‘या चित्रपटात (रश्मिकाचे) स्वागत आहे’ अशी रश्मिकाची फ्रेमही दिसते. नव्या प्रवासाची सुरूवात#D51, असे रश्मिकाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे. त्यासह तिने शेखर कमुल्ला, धनुष यांच्यासह चित्रपटाशी संबंधित इतर लोकांनाही टॅग केले आहे.
या चित्रपटाचं खरं नाव काय, तो कधी रिलीज होईल, वगैरे यैबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेल नाही. मात्र या चित्रपटाद्वारे धनुष आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
पुष्पा 2 बद्दल बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी एक टीझर व्हिडिओ जारी करून निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होऊ शकतो, अशी चर्चा आहे.