बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्र्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफच्या घरातील मोलकरणीने जेव्हा चोराला पाहिलं, तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ तिथे आला आणि त्याच क्षणी चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. आता या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचाच गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी नुकतंच ट्वीटरद्वारे एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला नको का? असा प्रश्न वर्षा गायकवाड यांनी विचारला.
“जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, जिथे हाई प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात.. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री @Dev_Fadnavis यांनी स्वतःला विचारायला नको का? अभिनेता पद्मश्री सैफ अली खान यांच्यावरील चाकू हल्ला अतिशय भयानक आणि धक्कादायक घटना आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. वांद्रेसारख्या परिसरात एका लोकप्रतिनिधीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो.. अशाप्रकारची उघड-उघड दहशत पाहण्यासाठी मुंबई सरावलेली नाही”, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
“कायद्याचे पालन करणारे राज्य म्हणून आपण नेहमीच अभिमानानं महाराष्ट्राकडे पाहत आलो. पण आता परिस्थिती खरोखरंच हाताबाहेर जात चालली आहे. गुन्हेगारांची पाठ थोपटतंय तरी कोण? कोणाचं पाठबळ मिळतंय यांना की, कायद्याचा जरा ही धाक राहिलेला नाही? महाराष्ट्रात जे घडत आहे, ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. वाढत्या गोळीबाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणं आणि सीएम व डीसीएमसोबत फोटो काढणं, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचं राजकारण वाढणं या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांच्या मनातून कायद्याची भीती नाहीशी झाली आहे. सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. राज्याचे गृहमंत्री करताहेत तरी काय?” असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.
जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत,
जिथे हाई प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात.. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री @Dev_Fadnavis यांनी… pic.twitter.com/r0P4tzCyAr— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 16, 2025
दरम्यान सैफवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर त्याच्या घरात दबा धरून बसली होती, अशीही माहिती समोर येत आहे. रात्री दोन वाजता त्याच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सुरू असल्याचा आवाज सैफला आला. हा आवाज ऐकून तो बाहेर आला, तेव्हा चोराने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर हा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का? याचा पोलीस तपास करत आहेत.