बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याच्या घरावर रविवारी पहाटे झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ माजली. हा गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा कसून शोध घेत पोलिसांनी त्यांना 48 तासांच्या आत अटक केली. याप्रकरणी रोज नवनवे खुलासे होत असून आता यासंदर्भात आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या गोळीबाराचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे.
सचिन पोटे आणि तुषार काळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली पिस्तुल या दोघांच्या गाडीतून जप्त केलेली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना विविध टप्यावर अनोळखी व्यक्तींकडून विविध गोष्टी पुरवण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येकवेळी या वस्तू देण्यासाठी येणारी व्यक्ती आरोपींसाठी अनोळखी असायची. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले पिस्तुल हे मुंबईत आल्यावर अज्ञात व्यक्तींकडून पुरवण्यात आले होते. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याच्या काही तास आधीच नेमबाजांना बंदूक पुरवण्यात आली होती. या बंदुकीचा पुरवठा 13 एप्रिलच्या रात्री वांद्रे भागात करण्यात आला आणि 14 एप्रिलच्या पहाटे दोन्ही शूटर्सनी सलमानच्या घरावर गोळीबार केला. मात्र बंदूक पुरवणारी व्यक्ती कोण होती ? याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
आरोपींना 12 गोळ्या झाडण्याचे आदेश
सलमानला घाबरवण्यासाठीच बिश्नोई गँगकडून आरोपींना त्याच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती. कमीत कमी दोन मॅगझीन घरावर फायर करण्याचे टारगेट दोन्ही आरोपींना देण्यात आलं होत. 2 मॅगेझिन अर्थात 12 गोळ्या फायर करा, असे आदेश हल्लेखोरांना देण्यात आले होते. मात्र, हल्लेखोरांना 12 गोळ्या फायर करता आल्या नाहीत. दोन्ही आरोपींना कामासाठी आधी 1 लाख मिळाले होते, अशी माहिती चौकशीत समोर येत आहे. काम फत्ते झाल्यावर आरोपींना नंतर आणखी 3 लाख मिळणार होते.
याप्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याचे नावही आरोपी म्हणून नोंदवण्यात आले. गोळीबारानंतर अनमोल बिश्नोईने फेसबुकवर पोस्ट करुन गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याने त्याला आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं. सध्या कॅनडामध्ये असलेल्या अनमोल बिश्नोईविरोधात पोलिस लुक-आऊट सर्क्युलर जारी करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.