अभिनेता सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. अनुज थापन असे मृत आरोपीचे नाव असून त्याने पोलिस कोठडीतच चादरीने गळफास लावून घेतला. त्याची प्रकृती गंभीर होती. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आज सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस कोठडीची पाहणी करण्यास गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना शस्त्र पुरवल्याचा आरोप अनुजवर होता.
14 एप्रिल, रोजी रविवारी पहाटेच्या सुमारास वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटधील सलमान खानच्या घरावर दोघांनी गोळीबार केला होता. बाईकवररून आलेले दोन्ही शूटर्स गोळीबार करून तातडीने फरार झाले आणि मजल दरमजल करत ते गुजरातच्या भुज येथील एका मंदिरात जाऊन लपले होते. मुंबई पोलिस तसेच क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास करत दोन दिवसांच्या आत त्या शूटर्सना शोधून काढले होते. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी त्या आरोपींची नावे होती. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती.
चौघांना अटक
त्यानंतरही पोलिसांकडून तपास सुरूच होता. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली. एकूण चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही शूटर्सना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी पंजाब येथून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांनाही बेड्या ठोकल्या. या आरोपींपैकीच अनुज थापन याने आज पोलिस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्याने चादरीने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचा मृत्यू झाला. अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करत होता, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत.
Salman Khan residence firing case | Accused Anuj Thapan who attempted suicide in custody has been declared dead by doctors at the hospital: Mumbai Police https://t.co/3OMrikn0nP
— ANI (@ANI) May 1, 2024
हल्ल्याआधी घराची आणि फार्महाऊसची केली होती रेकी
मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्याआधीच शूटर्सनी चार वेळा सलमान खानच्या घराची रेकी केली होती. एवढंच नव्हे तर त्यांनी एकदा सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवरही पाळत ठेवली होती. मात्र बऱ्याच काळापासून सलमान फार्महाऊसवर आलाच नव्हता त्यामुळे हल्लेखोरांनी त्याच्या वांद्रे येथील घरावरच गोळीबार करण्याचा प्लान आखला. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले पिस्तुल हे मुंबईत आल्यावर अज्ञात व्यक्तींकडून पुरवण्यात आले होते. तर खर्चासाठी लागणारे पैसेही अनोळखी व्यक्तीने दिले होते. त्याचबरोबर घर भाड्याने घेण्यासाठी अनोळखी व्यक्तीने मध्यस्थी केली होती. सलमान खानच्या घरावर गोळीबार होण्याच्या काही तास आधी शूटर्सना बंदूक पुरवण्यात आली होती. या बंदुकीचा पुरवठा 13 एप्रिलच्या रात्री वांद्रे भागात करण्यात आला आणि 14 एप्रिलच्या पहाटे दोन्ही शूटर्सनी सलमानच्या घरावर गोळीबार केला.
आरोपींना 12 गोळ्या झाडण्याचे होते आदेश
सलमानला घाबरवण्यासाठीच बिश्नोई गँगकडून आरोपींना त्याच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती. कमीत कमी दोन मॅगझीन घरावर फायर करण्याचे टारगेट दोन्ही आरोपींना देण्यात आलं होत. 2 मॅगेझिन अर्थात 12 गोळ्या फायर करा, असे आदेश हल्लेखोरांना देण्यात आले होते. मात्र, हल्लेखोरांना 12 गोळ्या फायर करता आल्या नाहीत. दोन्ही आरोपींना कामासाठी आधी 1 लाख मिळाले होते, अशी माहिती चौकशीत समोर येत आहे. काम फत्ते झाल्यावर आरोपींना नंतर आणखी 3 लाख मिळणार होते.