अभिनेता सलमान खान याच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी पहाटे दोघांनी गोळीबार केल्याने एकच खळबळ माजली. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. या गोळीबाराप्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट एक महिन्यापूर्वीच रचण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेतच हा कट रचला गेला असी माहिती समोर आली आहे. रविवारी पहाटे ४.५० वाजता बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला. त्यांनी अनेक राऊंड फायर केल्या. या गोळीबारात कोणीही जखमी झालं नसल तरी या घटनेमुळे सलमानचे चाहते आणि कुटुंबीय चिंतेत आहेत.
अमेरिकेत रचला गेला कट
मिळालेल्या माहितीनुसार, फायरिंगचा हा कट अमेरिकेत रचला गेल्याचेही समोर आले आहे. तसेच वेगवेगळ्या नंबर्सवरून शूटर्सना या गोळीबाराचा आदेश देण्यात आला होता, अशी माहितीही उघड झाल्याचे वृत्त आहे.लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे. अनमोल बिश्नोई याने फायरिंगची जबाबदारी रोहित गोदारा याच्याकडे सोपवली होती. गोदारा याच्याकडे 12 पेक्षाही जास्त प्रोफेशनल शूटर्स असल्याने त्याच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.रोहित गोदारा अमेरिकेत असला तरी त्याचे देशातल्या अनेक राज्यांमध्ये प्रोफेशनल शूटर आहेत, अशी माहिती समोर आली आहे. रोहित गोदाराच्या ईशाऱ्यावरच शूटर्स आणि ते कोणती बंदूक वापरणार हे ठरवण्यात आले.
तसेच या गोळीबाराची जबाबदारी घेणाऱ्या फेसबूक पोस्टचा आयपी ॲड्रेस हा कॅनडातील असल्याचंही समोर आलं आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. पोलिसांकडून या अकाऊंटची माहिती काढण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे.
का केला गोळीबार ?
सलमान खानच्या घरावर हा गोळीबार का करण्यात आला याबद्दल काही माहिती समोर आली आहे. बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सूत्रांनी दिलेल्या लॉरेन्स बिश्नोई गॅंगला दहशत निर्माण करायची असल्याने त्यांनी हा गोळीबारघडवून आणला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनंतर मुंबईवर राज्य करण्यासाठी गोळीबार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अभिनेता सलमान खान हा व्हीआयपी असल्यानेच त्याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. मुंबईत सध्या दाऊदची काहीच दहशत राहिलेली नाही, त्यामुळे बिश्नोई गँगला नव्याने जम बसवायचा होता यासाठीच हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार करून दाऊद गँगला आव्हान देण्याचा बिश्नोई गँगचा प्लॅन असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दाऊदला आव्हान देऊन मुंबईतून खंडणी वसूल करण्याचा बिश्नोई गँगचा प्लॅन असल्याचा दावा बडा अधिकाऱ्यांनी केला आहे.
पाच राज्यांतील पोलिसांकडून तपास
या गोळीबारानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गॅलेक्सी मधील सलमानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर आता पाच राज्यांतील पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, आणि पंजाब पोलिसांकडून हा तपास सुरू आहे.